25.3 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeसोलापूरसमांतर' जलवाहिनीचे नव्वद किमी काम पूर्ण

समांतर’ जलवाहिनीचे नव्वद किमी काम पूर्ण

सोलापूर : उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे ११० किलोमीटरपैकी ९० किलोमीटर काम पूर्ण झाले. नोव्हेंबर महिन्यात या पाइपलाइनची चाचणी पूर्ण होईल. पाकणी येथे ६६ एमएलडी क्षमतेचे नवे जलशुद्धिकरण काढण्याची फेरनिविदा जाहीर केल्याचे स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चौबे यांनी रविवारी सांगितले. स्मार्ट सिटी कंपनीने जून २०२३मध्ये समांतर जलवाहिनीचे काम सुरू केले होते. एका वर्षात ११० किलोमीटरपैकी ९० किलोमीटरचे काम करण्यात यश आले.

या कामात अनेक अडथळे आले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त शीतल तेली उगले यांनी वेळोवेळी समन्वय बैठका घेऊन हे अडथळे संपुष्टात आणले. आणखी दहा किलोमीटरचे काम महिनाभरात पूर्ण होईल. जून ते ऑगस्ट या कालावधीत पाइपलाइनची ९० टक्के हायड्रोलिक चाचणी पूर्ण झालेली असेल, नोव्हेंबर महिन्यात उजनीचे पाणी सोरेगावला आणण्याच्या दृष्टीने काम सुरू आहे. सोरेगाव जलशुद्धिकरण केंद्रात हे पाणी पोहोचल्यानंतर टाकळी योजनेवरील ताणही कमी होईल. समांतरचे काम पूर्ण होताच शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा करणे शक्य होईल, असा दावाही त्यांनी केला.

पुढील तीन महिन्यांत रेल्वे क्रॉसिंग, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते पार करून पाइपलाइन टाकण्याचे काम होणार आहे.उजनी ते सोलापूर पहिली जलवाहिनी ११० एमएलडी क्षमतेची आहे. समांतर जलवाहिनी १७० एमएलडी क्षमतेची आहे. या जलवाहिनीसाठी पाकणी येथे आणखी एक जलशुद्धिकरण केंद्र आवश्यक आहे. या कामाची निविदा लोकसभा निवडणुकीपूर्वी काढली होती. या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने निवडणुकीनंतर पुन्हा निविदा काढण्यात आली. ही निविदा १६ कोटी ७४ लाख ४६ हजार रुपयांची असून, निविदा भरण्याची अंतिम तारीख १ जुलै आहे.उजनी ते सोलापूर जलवाहिनीला वरवडे, यावली आणि उजनी पंप या ठिकाणी गळती लागली आहे.

महावितरणची काही कामे प्रलंबित आहेत. या कामांसाठी मंगळवारी उजनी धरणातून दिवसभर पाणी उपसा होणार आहे. या कारणास्तव मंगळवारी आणि बुधवारी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ शकतो. हे काम चार तासांचे आहे. मात्र बराचवेळ पाणी उपसा बंद ठेवावा लागेल. त्यामुळे शहरवासीयांनी या आठवड्यात जपून पाणी वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने गेले. दरम्यान, औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरून वाहत आहेत. हिप्परगा तलावाचे पाणीही वाढत आहे. ही समाधानकारक बाब असल्याचेही चौबे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR