छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीनंतर बहुजन समाज पार्टीच्या (बसपा) मुंबईत आयोजित समीक्षा बैठकीनंतर छत्रपती संभाजीनगरकडे परतणा-या पदाधिका-यांच्या गाडीला समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर चौघे जण जखमी झाले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील गोंदे इंटरचेंजजवळ समृद्धी महामार्गावर पहाटे चारच्या सुमारास घडली.
सचिन सुभाष बनसोडे (रा. इंदिरानगर, गारखेडा परिसर) आणि प्रशांत सुनील निकाळजे (रा. संजयनगर, मुकुंदवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्या पदाधिका-यांची नावे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बसपाची समीक्षा बैठक मुंबईतील कार्यालयात मंगळवारी आयोजित केली होती. या बैठकीला छत्रपती संभाजीनगरचे बसपा जिल्हाध्यक्ष सचिन बनसोडे यांच्यासह इतर चार वाहने गेली होती. सायंकाळी बैठक संपल्यानंतर बसपा पदाधिकारी समृद्धी महामार्गावरून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते.
त्यात मारुती सुझुकी कंपनीची एक्सएल सिक्स कार (एमएच २० जीक्यू ८५१५) कंटेनर (एचआर ३८ एसी ३०९५) वर मागून धडकली. अपघात एवढा भीषण होता की, कारचा समोरील भाग चक्काचूर झाला. सचिन बनसोडे यांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील प्रशांत निकाळजे शुभम दसारे (२५, रा. पुंडलिकनगर), सचिन मनोहर साळवे (२५, रा. बंबाटनगर), शुभम दांडगे (२६, रा. जवाहर कॉलनी) आणि अनिल मनोहर (२९) हे गंभीर जखमी झाले. या सर्वांना सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचार सुरू असताना प्रशांत निकाळजे यांचा मृत्यू झाला. उर्वरित चार जणांना नाशिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.