28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती

अहमदनगर : राज्यातील सामाजिक सलोखा उद्ध्वस्त करण्याचे काम देवेंद्र फडणवीसांचे सरकार करत आहे. सत्तेच्या लालसेपोटी विविध समाजांना आरक्षण देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. ते समाजासमाजात आग लावत आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते गुरुवारी अहमदनगरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. संविधानात जे आरक्षण ओबीसींना मिळालं आहे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे, अशी हाके यांची मागणी आहे. राज्य सरकारने एक माचिसची काडी टाकून महाराष्ट्रात आग लावली आहे. आग लावता येते, मात्र विझवायला वेळ जातो. सरकार मराठा आणि ओबीसी दोघांनाही फिरवण्याचे काम करत आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. या सगळ्यावरचा रामबाण उपाय एकच जातीनिहाय जनगणना करणे. जितनी संख्या भारी, उतनी उसकी भागीदारी, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले.

लक्ष्मण हाके यांच्याकडून जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या रक्षणासाठी प्राणांतिक उपोषण सुरू आहे. मात्र, हे आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. यावर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, मनोज जरांगे हाकेंच्या आंदोलनाला सरकार पुरस्कृत बोलणार असतील तर मी त्यावर काहीही बोलणार नाही. हाके यांना समाजाच्या प्रश्नांची जाण आहे. हाके यांच्या आंदोलनाला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही. ते कुठल्याही राजकीय पक्षात नव्हते, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.
दुष्काळ आणि अतिवृष्टीने राज्यातील शेतकरी होरपळला आहे. २०२२ पासून एका रुपयाची मदतही शेतक-यांना मिळालेली नाही. काही प्रमाणात बीड जिल्ह्यात मंत्र्यांच्या लोकांना याचा फायदा झालाय. याबाबत आम्ही चौकशी करणार आहोत. राज्यात बियाणे आणि खतांचे दर वाढलेत. हे सरकार फक्त हमीभावाच्या थापा मारत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

शक्तिपीठ महामार्गावरून गंभीर आरोप
शक्तिपीठ महामार्ग हा पैसा खाण्याचा धंदा आहे. समृध्दी महामार्गात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पैसे खाल्ले. जमिनी विकून पैसा कमवायचा, हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे. हे सगळे चोर मिळून महाराष्ट्राला उद्ध्वस्त करतायत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR