लातूर : प्रतिनिधी
पंतप्रधान आवास व रमाई आवास (घरकुल) योजनेच्या माध्यमातून २०२३ या वर्षात एकूण २८३६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. या वर्षभरात एकूण १७७६ कुटुंबांनी घरकुलांची बांधकामे पूर्ण करत नव्या घरात गृहप्रवेश केला. लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना व रमाई आवास योजनांची अंमलबजावणी शहरात करण्यात येते. या योजना अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या वतीने प्रति लाभार्थी अडीच लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात येते. यात लाभार्थ्याकडे स्वत:च्या मालकीची जागा असणे आवश्यक असून त्या जागेवर शौचालयासह ३० चौरस मीटरचे बांधकाम करणे बंधनकारक आहे.
घर बांधकामासाठी मनपाच्या वतीने टप्प्याटप्प्याने अनुदानाचे वितरण केले जाते.सरत्या २०२३ या वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी दाखल केलेल्या अर्जंपैकी पात्र १८२३ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली. संपणा-या वर्षात एकूण १५६२ घरकुलांचे काम पूर्ण झाले.ही कुटुंबे नव्या घरात राहावयास गेली.लातूर महानगरपालिका क्षेत्रात आज पर्यंत एकूण ६ हजार ३१ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. त्यापैकी २ हजार ८६२ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. ज्या लाभार्थ्यांनी आजपर्यंत या योजनांचा लाभ घेतलेला नाही त्यांनी त्यासाठी मनपाकडे अर्ज सादर करावेत, असे आवाहन मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.