नवी दिल्ली : नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. यादरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) अनेक प्रश्न विचारले. नीट परीक्षेत ०.००१ टक्के निष्काळजीपणा असला तरी त्यावर कारवाई करावी, असे न्यायालयाने म्हटले आहे.
यासह सर्वोच्च न्यायालयाने एनटीए आणि केंद्र सरकारला नोटीस बजावली आणि या प्रकरणी उत्तर दाखल करण्यास सांगितले. नीट २०२४ परीक्षेचा निकाल वादाच्या भोव-यात सापडला आहे. सुप्रीम कोर्टात आज नीट परीक्षा रद्द करण्याची मागणी करणा-या याचिकेवर सुनावणी पार पडली. मोशन एज्युकेशन कोंिचगचे सीईओ नितीन विजय यांनी ही याचिका दाखल केली होती.
सुप्रीम कोर्टात याअगोदर १३ जून रोजी नीट २०२४ च्या निकालाला आव्हान देणा-या तीन याचिकांवर सुनावणी झाली होती. परीक्षेवरील आरोपांची रकळ समितीमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. तसेच ४ जूनच्या निकालाच्या आधारे होणारे कॉउंसलिंग बंद करावे, अशी मागणी देखील करण्यात आली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने कॉउंसलिंगवर बंदी घालण्यास नकार दिला होता. तर २३ जून रोजी पुनर्परीक्षा घेतली जाईल असे स्पष्ट केले होते.