30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरसर्व दवाखाने  बंद ठेवून केला तीव्र निषेध

सर्व दवाखाने  बंद ठेवून केला तीव्र निषेध

लातूर : प्रतिनिधी
कोलकात्यातील अमानवीय घटनेच्या निषेधार्थ आयएमए, निमा, होमिओपॅथी, आयडीए, मार्ड व नर्सिंग स्टाफ या संघटनांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी लातुरात कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. शनिवारी सर्व दवाखाने बंद ठेवून या प्रकरणातील आरोपीना फास्ट ट्रॅक कोर्टाच्या  माध्यमातून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. सर्व वैद्यकीय संघटनांच्या  वतीने शनिवार अत्यावश्यक सेवा वगळता वैद्यकीय  सेवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार हे आंदोलन करण्यात आले.
कोलकात्यातील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या एका महिला डॉक्टरवर अमानुष बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची अमानवीय घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला असून आरोग्य क्षेत्रात काम करणा-या तज्ज्ञ डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफच्या सुरक्षेचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी शहराच्या महात्मा गांधी चौकातील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयापासून  ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कपर्यंत व तेथून परत रुग्णालयापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला. या कँडल मार्चमध्ये लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे, आयएएमचे अध्यक्ष डॉ. उमेश कानडे, सचिव गणेश बंदखडके, डॉ. अशोक पोद्दार, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. गिरीश कोरे, डॉ. अभय कदम, डॉ. संगमेश चवंडा, डॉ. अजय  ओव्हाळ , डॉ. शैलेंद्र चव्हाण, डॉ. उमेश लाड, डॉ. विमल होळंबे, डॉ. क्रांती साबदे , डॉ. सुरेखा काळे, डॉ. शांता कानडे, डॉ.अनुजा कुलकर्णी, डॉ. मोहिनी गानू, डॉ. शुभांगी राऊत, डॉ. शैला सोमाणी, डॉ. ऋजुता अयाचित, डॉ. सचिन इंगळे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. रमेश भराटे, डॉ. महेश सावंत, डॉ. सचिन जाधव यांच्यासह शहरातील अनेक तज्ज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी तसेच पदव्युत्तर शिक्षण घेणारे डॉक्टरशी सहभागी झाले होते.
कँडल मार्चमध्ये आपले विचार व्यक्त करताना खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी  या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करुन आपण संसदेतही हा विषय उपस्थित करुन याप्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी लावून धरु, असे सांगितले. त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणा-यांवर भ्याड हल्ले होणे, अशा अमानवीय घटना घडणार नाहीत यासाठीची उपाय योजना करण्यासाठीही आपण सर्वतोपरी उपाययोजना करु, असे त्यांनी सांगितले.  या कँडल मार्च व राष्ट्रव्यापी बंदमध्ये आयएमए लातूर, एम.एस.एम.टी. लातूर, मार्ड  लातूर, मॅग्मो लातूर,  एमसीएमओ लातूर, वैद्यकीय विद्यार्थी संघटना, नर्सिंग संघटना, पॅरा मेडिकल असोसिएशन यासह  डॉक्टर्स संघटनांनी कँडल मार्चमध्ये सहभाग घेतला. राष्ट्रव्यापी दवाखाने बंद ठेवण्याच्या आवाहनास सर्वच डॉक्टरांनी प्रतिसाद दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR