छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी
अभिनेता सलमान खानच्या घरावर हल्ला प्रकरणाचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आले आहे. शहरातील जालानगरचा रहिवासी असलेला वस्ती मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याचा या घटनेत सहभाग होता.
त्याच्यावर हल्ल्यासाठी लागणा-या शस्त्रांची तस्करी करण्याची जबाबदारी देण्यात आली होती, अशी माहिती मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तर बिष्णोई गँगमधील असलेल्या लोकांसोबत तो सातत्याने संपर्कात असल्याचे देखील उघड झाले आहे.
१४ एप्रिलच्या पहाटे अभिनेता सलमान खानच्या घरावर अज्ञात लोकांनी गोळीबार केला होता. या घटनेत मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या भागातून सहा संशयितांना अटक केली. त्यावेळी केलेल्या तपासात सोनू सुभाष चंदर आणि अनुज थापण यांनी हल्लेखोरांना जवळपास ४० काडतुसेही दिली होती. तर सागर पाल याला चार मॅग्झिन आणि ४० काडतुसे दिली.
त्यातल्याच पाच गोळ्या सलमान खानच्या घरावर झाडण्यात आल्या होत्या. हल्लेखोरांचे सलमान खानच्या फार्म हाऊसवर देखील हल्ला करण्याचे नियोजन होते, अशी माहिती समोर आली. याप्रकरणात पनवेल पोलिसांनी वसीम चिकनासह, धनंजय सिंग, तापेसिंगा, अजय कश्यप, गौरव भाटिया, इलियास नखवी, झिशान खान जावेद खान यांना अटक केली आहे.
दरम्यान यातील वस्ती मोहम्मद ऊर्फ वसीम चिकना याचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन समोर आले आहे. तो शहरातील जालानगरचा रहिवासी असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.