30.2 C
Latur
Sunday, February 23, 2025
Homeमहाराष्ट्रसहावीपर्यंतच्या वर्गासाठी महिला शिक्षक आणि कर्मचारी नेमा

सहावीपर्यंतच्या वर्गासाठी महिला शिक्षक आणि कर्मचारी नेमा

मुंबई : प्रतिनिधी

बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर शिक्षण विभागाने कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शाळेमध्ये नव्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भरती होणा-यांसाठी आता पोलिसांच्या दाखल्याची सक्ती करण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश शिक्षण विभागाकडून पारित करण्यात आला आहे. त्यामुळे नव्याने भरती होणा-या शिक्षकांचे पोलिस व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे आता शिक्षकांनी कामावर रुजू होताना त्यांच्या चारित्र्याचा, त्यांच्यावर गुन्हे दाखल नसल्याचा दाखला पोलिसांकडून आणणे बंधनकारक असणार आहे. बदलापूर अत्याचार घटनेनंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यासोबत सहावीपर्यंतच्या वर्गात शिक्षक आणि कर्मचारी शक्यतो महिला नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

बदलापूर येथील एका नामांकित शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. शाळेतील एका सफाई कर्मचा-याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर राज्यभरातील अनेक शाळांमध्ये खबरदारी घेतली जात आहे. शिक्षण विभागाकडून आता राज्यातील शिक्षकांना पोलिस व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात दाखला घेण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू झाली आहे.

राज्यभरात अनेक ठिकाणी शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसोबत अनेक घृणास्पद प्रकार घडल्याचे समोर आले आहे. शिक्षकी पेशाला काळिमा फासणा-या घटना समोर आल्याने पालकांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून राज्याच्या शिक्षण विभागासोबत शाळा व्यवस्थापनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना पोलिस व्हेरिफिकेशन सक्तीचे करण्यात आले आहे. शिक्षकावर आतापर्यंत कोणता गुन्हा दाखल आहे का, त्याची वर्तणूक कशी आहे याची माहिती असलेला पोलिसांचा दाखला सक्तीचा करण्यात आला आहे. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे महिला शिक्षकांनाही अशा प्रकारचा दाखला द्यावा लागणार आहे.

काय म्हटलंय आदेशात?

– नव्याने भरती झालेल्या शिक्षकाला पोलिसांचे व्हेरिफिकेशन बंधनकारक
– शाळेतील स्वच्छता कर्मचा-यांनाही पोलिसांचे व्हेरिफिकेशन बंधनकारक
– शाळेतील चालकांनाही चारित्र्य प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य
– सर्व सरकारी आणि खासगी शाळांना हे नियम लागू असणार
– सहाव्या वर्गापर्यंत शक्यतो शिक्षक आणि कर्मचारी महिलाच नेमाव्यात
– सर्व शाळांनी महिनाभरात सीसीटीव्ही बसवावेत, ठराविक वेळेत तपासावेत
– सीसीटीव्हीची तपासणी ही मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी
– शाळेत तक्रार पेटी लावावी आणि तक्रार असेल तर तात्काळ कारवाई करावी

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR