22 C
Latur
Friday, November 15, 2024
Homeलातूरसहाही मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील गृह मतदान पूर्ण 

सहाही मतदारसंघांत पहिल्या टप्प्यातील गृह मतदान पूर्ण 

लातूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तसेच भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांना उपलब्ध करून दिलेल्या सुविधेनुसार जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपासून गृह मतदान (होम वोंिटग) सुरु झाले आहे. यामध्ये दिव्यांग मतदारांसह वयाची शंभरी ओलांडलेल्या आजी-आजोबांनीही मतदानाचा हक्क बजाविला. तसेच भारत निवडणूक आयोगाने घरातूनच मत नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघात ११ नोव्हेंबर रोजी गृह मतदानाचा पहिला टप्पा झाला. यामध्ये नियोजित मतदारांच्या जवळपास ९४ टक्के मतदारांनी आपला अधिकार बजाविला. तसेच उदगीर आणि निलंगा विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील गृह मतदान झाले. दिव्यांग मतदारांसह वयोवृद्ध मतदारांनी यावेळी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. निलंगा येथे सामान्य निवडणूक निरीक्षक लक्ष्मीकांत प्यारेलाल प्रधान यांनी या प्रक्रियेची पाहणी केली. १४ नोव्हेंबर रोजी निलंगा विधानसभा मतदारसंघात ७०१ मतदारांचे गृह मतदान पूर्ण झाले.
उदगीर येथे निवडणूक निर्णय अधिकारी सुशांत शिंदे यांनी करडखेल येथील वयाची १०५ वर्षे पूर्ण केलेल्या मतदार जिजाबाई किसन कसबे यांच्या गृह मतदानाप्रसंगी उपस्थिती लावली. १४ व १५ नोव्हेंबर रोजी उदगीर विधानसभा मतदारसंघात जवळपास ६२६ मतदारांनी आपला अधिकार बजाविला. अहमदपूर, लातूर शहर आणि औसा मतदारसंघातील गृह मतदानाचा पहिला टप्पा १५ नोव्हेंबर रोजी पार पडला. या मतदारसंघातील ज्येष्ठ मतदार, दिव्यांग मतदार यांनी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला. अहमदपूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत नळेगाव येथील गृह मतदान प्रक्रियेची सामान्य निवडणूक निरीक्षक साकेत मालवीया यांनी पाहणी केली.
लातूर शहरातील पूर्णपणे दिव्यांग असलेला युवक शेख अफताब खय्युम, संत गाडगेबाबा अनाथ व गतिमंद मुलांच्या बालगृहातील दिव्यांग मतदार ज्ञानेश्वर, उद्धव कराड, सचिनचिंताले यांनी आज मतदान केले. दिव्यांगत्वामुळे मतदान केंद्रांवर पोहचण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला असता, मात्र गृह मतदानामुळे मतदानाची प्रक्रिया सोयीस्कर झाल्याचा आनंद यावेळी त्यांच्या पालकांनी व्यक्त केला. लातूर शहर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी न-हे-विरोळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सौदागर तांदळे, गणेश सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गृह मतदानाचे नोडल अधिकारी रूक्मानंद वडगावे, सहायक नोडल अधिकारी सूर्यकांत लोखंडे, सोमेश्वर होळकर यांनी जास्तीत जास्त मतदान पूर्ण करण्यासाठी नियोजन केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR