लातूर : प्रतिनिधी
गोरगरीब रुग्णांची पैश्याअभावी उपचारासाठी परवड होऊ नये, म्हणून शासनाच्या वतीने ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’, राबविण्यात येत आहे. या योजनेतंर्गत गेल्या सहा महिन्यात ५ हजार ८०७ रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे २३ कोटी ६५ लाख २४ हजार १६० रुपयांची बचत झाली आहे.
गरीब कुटूंबातील रुग्णांवर उपचाराचा भार पडू नये म्हणुन राज्य शासनाच्या वतीने ‘महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना ’ राबविण्यात येते. या योजनेतंर्गत पिवळे आणि केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांना आरोग्य सेवा देण्यात येत होती. दरम्यान ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना’ सुरु झाली आणि दोन्ही जनआरोग्य योजना एकत्रितपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. आता राज्य शासनाने जनआरोग्य योजनेतंर्गत शुभ्र रंगगाच्या रेशन कार्डधारकांनाही पाच लाखांपर्यंत आरोग्य सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची सोमवारपासून अंमलबजावणी सुरु होत आहे.
जिल्ह्यातील १४ रुग्णालयांतून रुग्णांना सेवा देण्यात येते. या योजनेचा अधिकाधिक रुग्णांना लाभ व्हावा म्हणुन प्रशासनाच्या वतीने सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात दारिद्रयरेषेखालील रेशन कार्डधारक ८६ हजार २७ आहे. अंत्योदय योजनेतंर्गतच्या ४२ हजार २४५ शिधापत्रिकाधारक आहेत. एपीएल शेतकरी कार्डधारक ४७ हजार ६४४ आहेत., पीएचएच केशरी कार्डधारक २ लाख ६१ हजार ८११ आहेत. तर एनपीएच केशरी कार्डधारक २० हजार ८४७ आहेत. जिल्ह्यात शुभ्र शिधापत्रिकाधारकांची संख्या २३ हजार ४५२ आहेत
.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतंर्गत कर्करोग, -हदयरोग शस्त्रक्रिया अशा गंभीर आजारावर उपचार करण्यात येतात. पाच लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य संरक्षण दिले जाते. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य पाच लाख रुपयांचे उपचार प्रतिकुटूंब, प्रतिवर्ष मिळतात. त्यामुळे गोरगरीबांना मोठा आधार मिळत आहे. याजेनेतंर्गत जिल्ह्यात एकुण १४ रुग्णालये आहेत. त्यात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विवेकानंद हॉस्पिटल, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयांसह अन्य खासगी रुग्णालये आहेत.