29.7 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeसोलापूरसाडेचार कोटींच्या अनियमिततेवरून डीसीसी पतसंस्था संचालकांना नोटिसा

साडेचार कोटींच्या अनियमिततेवरून डीसीसी पतसंस्था संचालकांना नोटिसा

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक कर्मचारी सहकारी पतसंस्थेत . सुमारे चार कोटींहून अधिक रक्कम बेकायदेशीरपणे खर्ची दाखविणे तत्कालीन पदाधिकाऱ्यांना महागात पडले आहे. चेअरमन शशी ऊर्फ मिलिंद शिंदेसह १६ संचालक व प्रभारी सचिवाला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ अन्वये चौकशी अधिकारी उमेश पवार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपले म्हणणे १० जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सादर चे करण्याबाबत नोटीसमध्ये म्हटले आहे.

संस्थेचे सभासद धन्यकुमार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून उत्तर तालुक्याचे सहायक निबंधक आबासाहेब गावडे यांनी चौकशी केली होती. गावडे यांना तक्रारीत गंभीर बाबी आढळून आल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन संचालक मंडळाच्या कारभाराची ८३ अन्वये सखोल चौकशी करण्यासाठी विशेष लेखापरीक्षक बी. सी. पवार यांची नेमणूक केली होती. पवार यांनी कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाच्या चौकशी अहवालात गैरव्यवहार झाल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यामुळे झालेल्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करण्यासाठी सहायक निबंधक उमेश पवार यांची नियुक्ती केली आहे. ८३ च्या चौकशी अहवालात नमूद गंभीर बाबींचा उल्लेख करीत तत्कालीन पदाधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे.

आबासाहेब गावडे यांच्या अहवालात २०१८-१९ ते २०२१-२२ या कालावधीत संस्थेच्या कामकाजात गंभीर दोष, कामकाजात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर ९ मुद्द्यांवर संचालक मंडळाला दोषी ठरवत नोटीस बजावली असून, १० जानेवारीपर्यंत लेखी म्हणणे मांडण्याची नोटीस दिली आहे. तत्कालीन चेअरमन शशी ऊर्फ मिलिंद शिंदे यांनी संचालक मंडळाची मंजुरी न घेता ४४ लाख रुपये अनामत उचलून रकमेचा दुरुपयोग केला. त्याप्रमाणेच प्रभारी सचिव लक्ष्मीपुत्र अरवतवक्कल यांनी वेळोवेळी २९ लाख ४२ हजार रुपये अनामत उचलून स्वतः साठी वापरली. चेअरमन शिंदे व सचिव अरवतवक्कल यांनी अनामत रक्कम भरली. १२ टक्के व्याज वसूल करण्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.
संख्येचे कार्यालय डीसीसी बँकेच्या जागेत विनामोबदला सुरू असताना जागा खरेदीसाठी दोन कोटी ७४ लाख ९३ हजार रुपये कायदेशीर प्रक्रिया न करता वापरली. संस्थेच्या रकमेचा अपहार व गैरव्यवहार करून संस्थेचे आर्थिक नुकसान केले आहे.

एम.एस. त्रिमूर्ती कन्स्ट्रक्शनच्या नावे दोन लाख ४० हजार रुपयांचा खोटा जमाखर्च दाखवून गैरव्यवहार व अपहार केला आहे. निमगाव येथील अष्टविनायक संस्थेच्या नावे ७ लाख, समृद्धी मेडिकलच्या नावे चार लाख, मयत सभासद वारसांना एक लाख ८० हजार रुपये अशी १२ लाख ९५ हजार इतकी रक्कम संचालक मंडळाची मंजुरी न घेता खर्च केली.

मेंटेनन्सच्या नावाखाली बिरप्पा वरवटी यांच्या नावे ६ लाख ६५ हजार व वेतन खर्च समाधान गायकवाड यांच्या नावे ४ लाख ३८ हजार रुपये शिपाई म्हणून खर्ची टाकले. मात्र, त्यांना नेमणूक दिल्याचा आदेश संस्थेच्या दप्तरी दिसत नाही.
संगणक व लॅपटॉपसाठी विना पावती ३ लाख ४३ हजार ५०० रुपये खर्च केला आहे. संगणक व लॅपटॉपचे दप्तर संस्थेत आढळले नाही. स्टेशनरी व प्रिंटिंगसाठी ६ लाख ३६ हजार खर्च दाखविला. मात्र, संस्थेकडे त्याची नोंद नाही. संचालक मंडळाचा ठराव नाही व खरेदीची कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबवली नाही.

विना पावती खर्च टाकून, संचालक मंडळाची परवानगी न घेता एक लाख ६१ हजार रुपये बेकायदेशीररीत्या वकिलाच्या नावे सल्लागार फी, अंतर्गत तपासणीसाठी ५ लाख ३४ हजार रुपये खर्ची टाकून अपहार व गैरव्यवहार करून संस्थेचे आर्थिक नुकसान केले. मेडिक्लेम कमिशन संस्थेला न देता चेअरमन यांनी घेतले.
एकूण चार कोटींहून अधिक रकमेत व त्यावर १२ टक्के व्याजाच्या रकमेस आपणास वैयक्तिक व सामुदायिक जबाबदार का धरू नये?, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

चेअरमन शशी शिंदे, व्हाईस चेअरमन सुधीर जाधवर, संचालक अभिमन्यू विजापुरे, राहुल कोंडारे, प्रकाश पाटील, मारुती पारखे, समाधान मलपे, अजितकुमार गावडे, शिवानंद कारले, रमेश गोगाचे, कृष्णा बनकर, महेश जाधव, महादेव कोळी, राजकुमार सरवदे, संचालिका नीता उमाकांत शेटे, जयश्री श्रीकांत मिरगाळे, मानद सचिव सुरेश भाकरे, प्रभारी सचिव लक्ष्मीपुत्र अरवतवक्कल, आदी १८ लोकांना नोटीस बजावली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR