पुणे : प्रतिनिधी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे दरवर्षीप्रमाणे यंदाही ७व्या विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२५) या आपल्या वर्षातील सर्वांत मोठ्या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन/ आंतरविद्यापीठीय क्रीडा महोत्सवासाठी सज्ज झाले आहे. यंदा या स्पर्धेचा ७वा हंगाम २४ ते २९ जानेवारी २०२५ दरम्यान विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात पार पडणार आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार, दि. २४ जानेवारी २०२५ रोजी महाराष्ट्राचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे. सदर कार्यक्रम माईर्स एमआयटी शिक्षण समुहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या अध्यक्षतेखाली तर राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार प्राप्त नेमबाज अंजली भागवत व अर्जुन पुरस्कार विजेते पॅरा अॅथलिट सचिन खिलारे (रौप्य पदक विजेता, पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धा २०२४) विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, डॉ. सुनीता कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात बुधवार, दि. २९ जानेवारी रोजी शिरूर-हवेली मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर कटके, ब्रिगेडियर दिलीप पटवर्धन (निवृत्त) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
एमआयटी एडीटी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या १५०+ एकरांच्या प्रशस्त व विविध क्रीडा सुविधांनी सुसज्ज अशा कॅम्पसमध्ये ‘खेळाच्या माध्यमातून राष्ट्र उभारणी’ या ब्रीदवाक्यासह होणा-या व्हीएसएम-७ मध्ये आत्तापर्यंत १३५ हून अधिक शैक्षणिक संस्थांमधील तब्बल ५ हजारांहून अधिक खेळाडूंनी १५ हून अधिक क्रीडा प्रकारांसाठी आपली नावनोंदणी केलेली आहे.
तसेच अद्यापही या स्पर्धेसाठी नाव नोंदणी चालू असून राज्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेऊन विद्यापीठाच्या सुसज्ज क्रीडा सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू तथा स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन प्रा. डॉ. राजेश एस., कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. सुराज भोयार यांनी केले आहे.