26.1 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रसारथी, बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी ‘आर्टी’

सारथी, बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी ‘आर्टी’

– मुंबईतील घाटकोपरमध्ये होणार मुख्य कार्यालय

मुंबई : प्रतिनिधी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेच्या धर्तीवर मातंग समाजाच्या विकासासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या संस्थेच्या माध्यमातून मातंग समाजासाठी शिक्षण, उच्च शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्टार्ट-अप, रोजगारनिर्मिती आदी योजना राबविल्या जाणार आहेत.

अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश असणा-या मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास होण्यासाठी व अनुसूचित जातीविषयक कल्याणकारी धोरणाचा मातंग समाजाच्या व्यक्तींना योग्य प्रमाणात लाभ पोहोचण्यासाठी क्रांतीगुरू लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग स्थापन करण्यात आला होता. या आयोगाने शासनास आपला अहवाल दिला आहे. आयोगाने केलेल्या शिफारशींमध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या नावाने मुंबई येथे राष्ट्रीय स्मारक उभे करून त्यात संशोधन व ज्ञानार्जन यांच्या अद्यावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी शिफारस करण्यात आलेली होती. त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात मांडलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा करण्यात आली होती.

पावसाळी अधिवेशनात मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. सामाजिक न्याय विभागाने मंगळवार, दि. १६ जुलै २०२४ रोजी शासन निर्णय जाहीर केला. आर्टी या संस्थेच्या स्थापनेमुळे अनुसूचित जाती अंतर्गत मातंग व तत्सम जाती (मांग, मातंग, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग-म्हशी, मदारी, गारूडी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारूडी, मादगी, मादिगा) यांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR