लातूर : प्रतिनिधी
साहित्याचा आणि साहित्यकांचा सन्मान ही लातूरची संस्कृती आहे, या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्य लातूर वासीयांनी अबाधित ठेवण्याची परंपरा राखली आहे, असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातील दयानंद सभागृहात कवी संमेलन सोहळा व आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम पार पडला. यावेळी ते बोलत होते.
महापुरुषाच्या प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. द्वारकादास श्यामकुमार ग्रुप आणि तुकाराम पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनातील विविध विषयांवरील कवितांचा माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या रसिक श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला. दरम्यान या वेळी द्वारकदास श्यामकुमार ग्रुप संयोजन समितीकडून माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. तसेच यावेळी राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारप्राप्त लातूर जिल्ह्यातील दोन महिला शिक्षिका श्रीमती खडके अनिता आणि श्रीमती मामीलवाड सुनीता यांना प्रातिनिधिक स्वरूपात माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राज्य शासनाचा मराठवाडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार माजी मंत्री आमदार अमित देशमुख आणि डीएस ग्रुप यांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
यावेळी बोलताना डीएस ग्रुपचे तुकाराम पाटील यांनी कवी संमेलन व आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मान सोहळा कार्यक्रमाच्या आयोजना मागील उद्देश व रुपरेषा विशद करीत सामाजिक क्षेत्रात कार्य करताना आलेले अनुभव कथन करीत लातूरचे नेतृत्व कसे असावे या विषयी बोलताना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्याकडून मिळणारे सहकार्य आणि कापड व्यावसायिक म्हणून सुरवात केल्यापासून आजतागायत आलेले अनुभव याबद्दल माहिती दिली. या कवी संमेलनात कवियत्री वृत्तनिवेदिका यामिनी दळवी, कवी शब्बीर शेख, कवी अनंत राऊत, कवी अक्षय आरेकर, कवी रवींद्र केसकर, कवयत्री शिल्पा देशपांडे या महाराष्ट्र. राज्याच्या विविध भागातून कवी संमेलनात सहभागी झालेल्या आणि त्यांनी सादर केलेल्या एकाहून एक विडंबन,समाज प्रबोधनात्मक, राजकीय यासह सध्याच्या विविध ज्वलंत विषया वरील सादर केलेल्या कविताचा मनमुराद आनंद शिक्षण,वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांसह, पत्रकार, रसिक श्रोत्यानी लुटला.
या वेळी आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, ट्वेन्टी वन शुगर्सचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, प्रा. शिवराज मोटेगावकर, बाबुराव जाधव, सच्चिदानंद ढगे, रमेश बिराजदार, डॉ. राम बोरगावकर, प्रा. निलेश राजेमाणे, अॅड. दासरे, ओमप्रकाश झुरुळे, शशिकांत पाटील, ओमप्रकाश शिरुरे, प्रा. संभाजी नवघरे, ज्ञानेश्वर धुमाळ, सोनू डगवाले, राजेश्वर शिंदे, डॉ.अरविंद भातांब्रे, रामदास पवार यांच्यासह शिक्षक वृंद,पत्रकार,विविध क्षेत्रातील मान्यवर, महिला भगिनी,रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.