चेन्नई : वृत्तसंस्था
सिंधू लिपिचा उलगडा करण्याच्या स्पर्धेत आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनीही उडी घेतली आहे. या लिपिचा उलगडा करणा-याला १० लाख डॉलर्स म्हणजे ८ कोटी ६५ लाख ८१ हजार रुपयांचे बक्षिस देणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
साधरणत: आजच्या उत्तर भारत आणि पाकिस्तानात ही ५३०० वर्ष जुनी सिंधू/हडप्पा संस्कृती अस्तित्वात होती. हडप्पा ही जगातील सर्वात जुन्या आणि प्रगत संस्कृतींपैकी एक मानली जाते. विशेषत: या संस्कृतीची नगररचना, स्थापत्य आणि कला काळाच्या तुलनेत अत्यंत विकसित असल्याचं आढळून आलेलं आहे.
सिंधू संस्कृती नामशेष होण्याचं कोडं अजून सुटलेलं नाही. पण याहूनही आणखी अवघड कोडं आहे ते म्हणजे इथल्या लिपीचं. विविध पुरातत्व पुराव्यांमध्ये आढळून आलेली ही लिपी आणि भाषेचा अर्थ अजूनही शास्त्रज्ञांना लावता आलेला नाही. तो अर्थ जर लावता आला तर सिंधू संस्कृतीतील लोकांचे राहणीमान, जगण्याची पद्धत आणि एकूणच त्या काळातील राजकीय व सामाजिक व्यवस्थेचा उलगडा अगदी सहज करता येणार आहे.
मागच्या १०० वर्षांपासून भाषातज्ज्ञ, वैज्ञानिक आणि पुरातत्वशास्त्रज्ञ या लिपिचा उलगडा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या लिपीबाबत अनेक वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. पण तिचा ठोस अर्थ आजतागायत लागलेला नाही.