35.5 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रसिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचीच चलती

सिंहस्थ कुंभमेळ्यात भाजपचीच चलती

मित्रपक्षांच्या मंत्र्यांना दूर ठेवले!

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत आतापर्यंत विविध बैठका झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या मंत्र्यांनी त्याला हजेरी लावली. आता या बैठकांतून पुढील कामकाजाला दिशा देण्याचा प्रयत्न झाला आहे.

गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकला सिंहस्थाची विशेष बैठक झाली. बैठकीनंतर प्रशासनाकडून कामकाजाला गती देण्यात आली. सबंध प्रक्रियेत महाविकास आघाडीतील मोजक्या नेत्यांची आणि पक्षांचीच हजेरी होती. त्यामुळे तो चर्चेचा विषय आहे.
मुख्यमंत्र्यांनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर आणि नाशिक येथे साधू-महंतांची बैठक झाली. या बैठकांमध्ये साधू, महंत आणि आगामी कुंभमेळ्याबाबत आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. प्रशासन आणि मंत्री दोघांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एकंदरच भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिसले.

नाशिक जिल्ह्यात महायुतीचे तीन स्थानिक मंत्री आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि औषध व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे आहेत. मात्र या मंत्र्यांची सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बैठकीला अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवली.

जिल्ह्यात राजाभाऊ वाजे आणि भास्कर भगरे हे दोन खासदार आहेत. ते विरोधी पक्षाचे आहेत. त्यामुळे त्यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामकाजात फारसे विश्वासात घेण्यात आले नाही. त्यांनी याबाबत थेट संसदेत झालेल्या चर्चेत याकडे लक्ष वेधले. राज्य शासन खासदारांना कुंभमेळ्याच्या तयारीबाबत विश्वासात घेत नाही. खासदार वाजे यांच्या मतदारसंघातच सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्यामुळे त्यांच्या तक्रारीला महत्त्व आहे.

मात्र अशीच तक्रार सत्ताधारी महायुतीच्या नेत्यांची देखील आहे. विशेषत: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची नावे संभाव्य पालकमंत्री म्हणून स्पर्धेत आहेत. सध्या जिल्ह्याला पालकमंत्री नाही. अशा स्थितीत या दोन्ही मंत्र्यांना शासनातील व्यवस्थेने जाणीवपूर्वक कुंभमेळ्याच्या तयारीच्या कामकाजापासून अलिप्त ठेवले आहे. मंत्र्यांना आणि आमदारांना याबाबतचे निमंत्रण देण्यात आलेले नाही अशी तक्रार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा हा भारतीय जनता पक्षासाठी राजकीय मायलेज देणारा विषय आहे. शासनाचा दृष्टिकोन आणि कामकाजातील संथपणा विचारात घेता विकास कामे यापेक्षा प्रचारकी कुंभमेळा करण्यावर सरकारचा भर असू शकतो. तसेच संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे तर कृषिमंत्री कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना लांब ठेवण्याचे राजकारण तर होत नाही ना याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR