22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeसिप्ला कंपनीत कोल्हापूर,  सांगलीचे दोन तरुण मृत

सिप्ला कंपनीत कोल्हापूर,  सांगलीचे दोन तरुण मृत

 

वेर्णा : वृत्तसंस्था

गोव्यातील वेर्णा येथील सिप्ला या औषध निर्मीती कंपनीत झालेल्या अपघातात महाराष्ट्रातील दोन तरुण कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

या अपघातामध्ये दोघांचा गुदमरुन मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान या अपघातानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे सिप्ला युनिट-२ ब्रिकेट बॉयलर प्लांटमध्ये क्रशर दुरुस्ती करण्यासाठी लिफ्टच्या खड्यात उतरले होते. त्यावेळी गुदमरुन खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तत्काळ बाहेर काढून उपचारासाठी दक्षिण जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय पवार (२४) हा सांगलीचा तर अक्षय पाटील (२७) हा कोल्हापूर येथील होता. हे दोघे एनजे रिन्युएबल एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होते. तर तिस-या कर्मचा-यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची तब्येत स्थिर आहे.

आमदार विजय सरदेसाई यांनी गोवा विधानसभा अधिवेशनाच्या दहाव्या दिवशी दोन कामगारांच्या मृत्यूचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. सिप्ला कंपनीत गुदमरुन दोन कामगारांचा मृत्यू झाला ही घटना मोठी असून, मृत कामगार गोंयकार असो किंवा परप्रांतीय त्यांना न्याय मिळायला हवा. तसेच, कंपनीकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप यावेळी सरदेसाई यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR