मुंबई : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भातील एक सर्व्हे समोर आला आहे. ‘सी वोटर’नं तो सर्व्हे केला आहे. सी वोटरच्या आकडेवारीनुसार ५१ टक्के लोकांचा कल असा होता की, ज्यामुळं विद्यमान महायुती सरकारमधील राजकीय पक्षांची चिंता वाढू शकते.
सी वोटरच्या सर्व्हेमध्ये जेव्हा लोकांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही भाजप शिंदे सरकारच्या कामगिरीवर नाराज आहात का? आणि सरकार बदलण्याची इच्छा आहे का? तेव्हा ५१.३ टक्के लोकांनी याचे हो असे उत्तर दिले. त्यांनी सरकारच्या कामगिरीबाबत राग असून सरकार बदलण्याची इच्छा असल्याचं म्हटलं. ३.७ टक्के लोकांनी राग आहे पण सरकार बदलण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं. तर, ४१ टक्के लोकांनी सरकारच्या कामगिरीवर नाराज नसल्याचं म्हटलं. त्यांनी पुन्हा महायुती सरकार यावं, अशी त्यांना अपेक्षा आहे. ४ टक्के लोकांनी या प्रश्नावर काहीच बोलायचं नाही,असं म्हटलं. यातून असं दिसून येतं की सरकार बदललं जावं असं वाटणा-यांची संख्या जवळपास ५१ टक्के आहे.
मुख्यमंत्री म्हणून शिंदेंना सर्वाधिक पसंती
महाराष्ट्रातील लोकांना जेव्हा मुख्यमंत्री पदासाठी पसंती विचारण्यात आली तेव्हा २७.६ टक्के लोकांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावं असं वाटणा-यांची लोकांची टक्केवारी २२.९ टक्के आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला १०.८ टक्के लोकांनी पसंती दिली. शरद पवार यांच्या नावाला ५.९ टक्के तर अजित पवार यांच्या नावाला ३.१ टक्के लोकांनी पसंती दर्शवली.
महायुती सरकारची कामगिरी चांगली
सी वोटरच्या सर्व्हे नुसार ५२.५ टक्के लोकांनी कामगिरी चांगली राहिल्याचं म्हटलं. २१.५ टक्के लोकांनी कामगिरी सरासरी होती, असं म्हटलं. तर, २३.२ टक्के लोकांनी कामगिरी खराब असल्याचं म्हटलं.
निवडणुकीवर परिणाम करणारे मुद्दे
मराठा आरक्षणाचा मुद्दा २३.० टक्के लोकांनी प्रभावशाली मुद्दा असल्याचं मान्य केलं. तर, १२.२ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कामगिरी महत्त्वाचा मुद्दा असल्याचं म्हटलं. झोपडपट्टी पुनर्विकासाचा मुद्दा ९.८ टक्के लोकांनी महत्त्वाचा मानला. ७ टक्के लोकांनी सरकारची कामगिरी आणि योजनांबद्दल भाष्य केलं. शासकीय रुग्णालयांची स्थिती हा मुद्दा ८.२ टक्के लोकांना निवडणूक प्रभावित करणारा वाटला. ६ टक्के लोकांनी राज्यांची आर्थिक स्थिती आणि २.५ टक्के लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट हा मुद्दा प्रभावशाली असल्याचं सांगितलं.