छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
थंडीच्या दिवसांत शरीराला पौष्टिक घटकांची गरज असते. त्यामुळे घरोघरी सुकामेव्याचे लाडू बनवायला सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा सुकामेव्याचे भाव प्रति किलो १०० ते १५० रुपयांनी वाढले आहेत. तसेच शुद्ध देशी तुपाच्या भावात देखील वाढ झाली. त्यामुळे थंडीसाठी बनवल्या जाणा-या लाडूंसाठी गृहिणींना महागाईचा सामना करावा लागत असल्यानं त्यांचं आर्थिक बजेट काहीसे कोलमडले आहे.
आरोग्यासाठी हिवाळा अधिक पोषक मानला जातो. हिवाळ्यात भूक वाढते, त्यामुळे शरीराचा ‘पोषणकाळ’ म्हणून हिवाळ्याकडे बघितले जाते. अशातच थंडीत आरोग्याची काळजी घेण्यासाठी उष्म पदार्थांचे सेवन केले जाते. शरीराला उष्णता देणा-या पदार्थांचे सेवन केल्याने पोषणासह त्वचेसाठीही मदत होते, असा सल्ला डॉक्टरांकडूनही दिला जात असतो.
मात्र, यंदा गतवर्षी पेक्षा सर्वच सुकामेव्याचे भाव काही प्रमाणात वाढले आहेत. मात्र, अशात दर वाढले असले, तरी सुकामेव्याला चांगली मागणी असल्याची माहिती सुकामेवा व्यापारी सरिता शाह यांनी दिली.
खाद्य तेलाचे भाव कडाडले
खाद्यतेलाचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. या महागाईचा चांगलाच फटका बसला असून बाजारातील नवे दर आभाळा भिडले असल्याचं समोर येत आहे. खाद्यतेलांवरील मूल आयात करात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचाच फटका खाद्य तेलाच्या दरावर झाला असुन तब्बल २० ते २५ रुपयांची खाद्य तेलात वाढ झाली आहे त्यामुळे आता खाद्य तेल महाग झाल्याने स्वयंपाक घरात काम करणा-या गृहिणींसाठी फोडणी देखील महाग झाल्याच चित्र दिसून येत आहे.