बारामती : प्रतिनिधी
देशात लोकसभा निवडणुका लागल्या असून सर्वांत चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती. याठिकाणी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी रंगत होणार आहे. दरम्यान, आज पुण्यात महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची अचानक भेट झाल्याचे दिसून आले.
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांची आज पुण्यात भेट झाली. प्रचारादरम्यान झालेल्या या भेटीवेळी दोघांनीही एकमेकांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या.
रवींद्र धंगेकर आणि सुनेत्रा पवार हे दोघेही दणक्यात प्रचाराला लागले आहेत. अनेक परिसर पिंजून काढताना दिसत आहेत. याचवेळी पुण्यातील तळजाई टेकडी परिसरात ही भेट झाली. यावेळी दोघांनीही एकमेकांशी संवाद साधला आणि शुभेच्छाही दिल्या.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, उल्हास पवार, दत्ता धनकवडे, आप्पा रेणुसे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. शिवाय बरेच कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. दोन्ही नेत्यांसोबत अनेकांनी तळजाई टेकडीवर फोटोशूट केले आणि दोघांमध्ये चांगल्या चर्चा झाल्या. यावरुन राज्याची राजकीय स्थिती कशीही असली तरीही सुसंस्कृत राजकारणाचं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालं.