धुळे : प्रतिनिधी
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपचे डॉ. सुभाष भामरे यंदा हॅट्ट्रिकच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे त्यांनी प्रचारात स्वत:ला अक्षरश: झोकून दिले होते. या निवडणुकीत नाशिक जिल्ह्याचा भाग असलेल्या बागलाणचे मोठे महत्त्व आहे. धुळे मतदारसंघात महायुतीचे डॉ. भामरे आणि महाविकास आघाडीच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात सरळ सामना आहे.
विशेष म्हणजे यंदा वंचित बहुजन आघाडीसह अन्य कोणताही पक्ष मैदानात नाही. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत यंदा बच्छाव विरुद्ध भामरे अशी थेट लढत आहे. विविध स्थानिक प्रश्नांभोवती या निवडणुकीचा प्रचार झालेला आहे. यामध्ये बागलाण विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीची स्थिती आहे.
बागलाण मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत जागृत मानला जातो. शेतकरी चळवळीचा मोठा वारसा या मतदारसंघाला आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे कांदा निर्यात बंदी आणि शेतमालाला पुरेसे भाव नसल्याने मोठे आंदोलन झाले. राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. या पार्श्वभूमीवर निवडणूक जाहीर झाल्याने केंद्र सरकारविरोधातील शेतक-यांचा असंतोष यानिमित्ताने राजकीय मुद्दा बनला. त्यातच भाजपचे डॉ. भामरे यांच्याविषयी अनेक तक्रारी देखील होत्या. त्यामुळे भाजपला प्रचारात बचावात्मक भूमिका घ्यावी लागली. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला.
या मतदारसंघात यंदा ६४.२५ टक्के मतदान झाले. गतवर्षीच्या निवडणुकीच्या तुलनेत थोडेसे अधिक आहे.
२०१९ मध्ये या मतदारसंघातून डॉ. भामरे यांना मोदी लाटेच्या प्रभावात एक लाख १७ हजार ९५४ मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्यापेक्षा भामरे यांना ७२ हजार २५३ मतांची आघाडी होती. यंदाच्या निवडणुकीत देखील काँग्रेसची फारशी यंत्रणा येथे दिसून आली नाही.
मात्र, शेतक-यांचे प्रश्न आणि केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा लाभ घेत डॉ. बच्छाव यांनी वातावरण उभे करण्यात यश मिळविले होते. त्यातून त्यांना किती मते मिळतात हा उत्सुकतेचा विषय आहे. एकंदरच डॉ. भामरे यांची आघाडी किती कमी होते याची उत्सुकता आहे.