नागपूर : प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नागपूर विमानतळावर एका अनोळख्या व्यक्तीने सुषमा अंधारे यांना धमकी दिली. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे या नागपूरमध्ये होत्या. यावेळी त्यांना धमकी देण्यात आली.
विमानतळावरून सुषमा अंधारे बाहेर पडत असताना त्यांना एका व्यक्तीने धमकी दिली आणि जय श्री रामच्या घोषणा दिल्या. सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट करत त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सांगितले की, परभणी प्रकरणातील दोषी पोलिस अधिका-यांवर कारवाई व्हावी यासाठी सभागृहात आणि बाहेर संघर्ष चालू आहे. अशातच आता ३ वाजून ३६ मिनिटांनी नागपूर विमानतळावर डिपार्चर गेटवर विचित्र घटना घडली. मी, माझी ७ वर्षांची लेक आणि समता सैनिक दलाच्या अॅड. स्मिता कांबळे यांच्यासोबत होते.
यावेळी साधारण ६ फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमीप्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जिवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढे सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला असे त्यांनी सांगितले.