लातूर : प्रतिनिधी
डोळ्यात मिरची पूड टाकून २६ तोळे सोन्याचे दागिने लुटीचा बनाव करणा-या सराफा व्यापा-यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून सोने हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगीतले, दि. २३ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास लातूर येथील सराफा व्यापारी अमर अंबादास साळुंके, वय ३१ वर्ष, राहणार पोचम्मा गल्ली, लातूर याने पोलीस ठाणे लातूर ग्रामीण येथे तक्रार केली की, सराफ लाईन, लातूर येथील एका दुकानातून २० लाख ४६ हजार रुपये किमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने दुचाकीच्या डिक्कीमध्ये घेऊन नेहमीप्रमाणे गि-हाईकांना दाखविण्यासाठी रेणापुर येथे गेलो होतो. तेथून परत येत असताना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास रेणापुर ते लातूर जाणा-या रोडवरील कातळेनगरजवळ दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञान व्यक्तीने त्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्याच्या गाडीतील २६ तोळे सोन्याचे दागिने चोरुन घेऊन पळून गेले आहेत, अशी तक्रार केली.
सदर तक्रारीचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर ग्रामीण बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे लातूर ग्रामीणचे अधिकारी अमलदारांचे पथके तयार करुन मार्गदर्शन करुन तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले. पोलिसांनी बारकाईने घटनास्थळाची पाहणी केली. तसेच तक्रारदार अमर अंबादास साळुंके याचे डे कुशलतेने विचारपूस केली. घडलेली घटना व अमर साळुंके सांगत असलेल्या हकीकतमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती दिसून येत होत्या.
त्यावरुन पथकाने अमर साळुंके यास विश्वासात घेऊन विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, मला लोकांचे पैसे देणे झाल्याने सदरचे दागिने चोरी गेल्याचा बनाव करून त्यामधून माझा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी चोरीचा बनाव केल्याचे कबूल केले. तसेच त्याने रेणापूर ते लातूरकडे येणा-या रस्त्यालगत असलेल्या एका शेतामध्ये खड्डा करून लपवून ठेवलेले २० लाख ४६ हजार रुपयांचे २६ तोळ्याचे दागिने काढून दिल्याने ते पोलिसांनी हस्तगत केले आहे. खोटी तक्रार दिल्यावरुन अमर साळुंके याच्याविरुद्ध लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.