शिरुर अनंतपाळ : प्रतिनिधी
नगदी पीक समजल्या जाणा-या सोयाबीन पिकावर ‘ यलो मोझॅक ‘ (हळद्या) या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाला असून अडचणीत सापडलेल्या शेतक-यांंकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
शेतक-यांचे आर्थिक गणित अवलंबून असलेल्या पिकावर एकामागोमाग एक संकटे येत असल्याने तालुक्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. यंदा मृग नक्षत्रात पेरणी झाल्याने उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती मात्र शेंगा भरण्याच्या काळात सोयाबीन वर हळद्या रोग पडल्याने शेतक-यांच्याचिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान शिरूर अनंतपाळ तालुक्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे पिक घेतले जाते. यंदा ही सुमारे २२ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे.
सुरुवातीला पिकांपुरता पाऊस झाल्याने सोयाबीन चांगले बहरले. त्यानंतर सततच्या पावसाने सोयाबीनची उंची वाढली मात्र त्या प्रमाणात शेंगा लागल्या नाहीत. त्यात आता अतिवृष्टी व सोयाबीन वर हळद्या रोग पडल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार या भितीने शेतक-यांच्याचिंतेत वाढ झाली आहे.