लातूर : प्रतिनिधी
लातूर जिल्हा सायोबीनचे हब म्हणून ओळखला जातो. नगदी पीक म्हणून शेतकरी सोयाबीनला सर्वाधिक पसंती देतात. गत वर्षीही जिल्ह्यात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला. सोयाबीनचे उत्पादनही ब-यापैकी झाले. परंतू, सोयाबीनच्या दराने शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणले. ४ हजार ५०० रुपयांच्या वर सोयाबीनचा भाव सरकला नाही. अशातच आता खरीप हंमातील पेरणीची चिंता शेतक-यांना लागली आहे. बियाण्याचे भाव वाढल्याने शेतकरी अधिकच अडचणीत आला आहे. सोयाबीन बियाणाची ३० किलोची बॅग ३ हजार ३०० रुपयांना तर सोयाबीनच्या एक क्विंटलचा भाव ४ हजार ५०० रुपये आहे. शेतक-यांच्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यातील शेतक-यांनी दरवर्षीचा अनुभव लक्षात घेता शेतमालाचे भाव वाढतील. किमान सोयाबीनचे तरी भाव वाढतील या आशेने किमान ३० टक्के शेतक-यांनी सोयाबीन आपापल्या घरातच साठवुन ठेवले आहेत. परंतू, भाव काही वाढेना. ४ हजार ५०० रुपयांच्या वर भाव सरकेना. बाजारात बियाणे महाग तर शेतक-यांचा शेतमाल कवडीमोल, अशी परिस्थिती दिसून येत आहे. यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. शेतक-यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. सोयाबीनचा उतारा एका बॅगला एकरी पाच ते सहा क्विंटल होतो. लागवड व इतर खर्च वजा जाता शेतक-यांच्या पदरी काहींच पडत नाही. एकतर बी-बियाणे महाग दुसरी गोष्ट पिकांचा उतारा कमी आणि उत्पादीत शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शेतक-यांच्या कष्टाला मोलच नाही.
सोयाबीनचे पीक हे नासके पीक म्हणूनही ओळखले जाते. पावसाळ्यात सोयाबीनच्या पिकाला अतिपाऊस पाऊस झाला तर कधी कधी शेतक-यांच्या हाती काहींच लागत नाही. अशा पेच प्रसंगता ओल्या दुष्काळाचे सावट शेतक-यांवर उभे राहाते. त्यामुळे पिकली की शेती नाही तर मती, अशी परिस्थिती येते. अशा वेळी शासनाकडून कसलीही मदत मिळत नाही. मध्यंतरी तर शासनाने जाहीर केलेल्या हमी भावापेक्षाही कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ शेतक-यांवर आली होती. त्यात शेतक-याचे प्रचंड मोठे नूकसानही झाले.
दिवसेंदिवस शेतक-यांची आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामूळे शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला जात आहे. सालगडी ठेवणे अशक्य होत असल्याने शेत मजुरांवरच भागवावे लागत आहे. परंतू, सध्या शेतमजूरीचेही दर मनमानीपणे वाढले आहेत. शेतकरी पेरणी, अंतरमशागत यासाठी लहान ट्रॅक्टरचा वापर करतात. परंतू, पेट्रोल-डिझेलचेही भाव वाढल्याने मशागतीचेही दर वाढले आहेत.