सोलापूर (प्रतिनिधी) : प्रोफेशनल पोलिसिंग करीत असताना सोलापूरकरांच्या अपेक्षा लक्षात घेऊन लोकाभिमुख काम करणार असल्याचे नूतन पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ व क्राईम असोशिएशनच्यावतीने नूतन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना पोलिस आयुक्त एम. राजकुमार म्हणाले, महिलांच्या तक्रारीला प्राधान्य दिले जाईल, त्याचबरोबर रस्त्यावरील गुन्हेगारी (स्ट्रीट क्राईम) कमी करण्यावर भर देणार आहे.
दरम्यान शहरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कठोर पावले उचलली जातील असे सांगतानाच त्यांनी वाहतुकीच्या शिस्तीला अडथळा येणारा अटीट्युड चालणार नाही असा इशारा दिला. मोटरसायकल वरील नंबर प्लेटवर दादा, आप्पा, अण्णा, पक्षाचे चिन्ह, समाजाची ओळख पटणारी चिन्ह अशा गोष्टी कदापि खपवून घेतल्या जाणार नाहीत याचे भान वाहन मालकांनी ठेवावे. अशा वाहनधारकांवर आता कारवाई सुरू केली असून यापुढील काळात ती कठोर करण्यात येणार असून संबंधित वाहन चालक किंवा मालक यांची संपूर्ण माहिती जमा करण्याचे आदेश संबंधित पोलिसांच्या विभागाला दिले असल्याचेही एम. राजकुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले.
वाहन चालकांनी वाहन चालविताना शिस्त मोडली नाही पाहिजे. त्याचबरोबर रिक्षा चालकानीही शिस्तीचे पालन करावे असे आवाहन एम. राजकुमार यांनी केले. सायलेन्सर बदलून चालविण्यात येणारी वाहने, ट्रिपल सीट, फॅन्सी नंबर, युनिफॉर्म अशा बाबींवर सध्या काम करण्याच्या सूचना पोलिसांना दिले आहेत. परंतु पुढील काळात सूचना किंवा वेळ न देता प्रभावी कारवाई करण्यात येईल. त्याशिवाय शहरातील अवैध धंद्यांवर वेळोवेळी कारवाई करण्याचे संकेत पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी यावेळी दिले.
सध्या सर्वच पोलीस ठाण्यात पेंडिंग अर्ज निकाली काढण्याचे काम तत्परतेने सुरू आहे. सध्या 500 पेक्षा जास्त अर्ज निकाली काढण्यात आलेले असून उर्वरित अर्ज 15 मार्चपर्यंत संबंधितांची बाजू ऐकून घेऊन निकाली काढण्यात येतील असेही आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनीष केत यांच्या हस्ते पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी क्राईम असोसिएशनचे अध्यक्ष अमोल व्यवहारे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सचिव सागर सुरवसे, क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे माजी अध्यक्ष अनिल कदम यांच्यासह सर्व पदाधिकारी व प्रसार माध्यमातील प्रतिनिधी उपस्थित होते.
उत्सव प्रिय असणाऱ्या शहरात रात्रीच अचानक डिजिटल लावले जातात त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. यामुळे रात्री डिजिटल लावण्यावर निर्बंध आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी संबंधित सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचारी व रात्रगस्तीच्या पथकांना प्रभावीपणे रात्रगस्त राबविण्याच्या सूचना दिले आहेत. डिजिटल लावताना कोणी आढळून आल्यास त्यांची कसून चौकशी करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिलेल्या आहेत.