चंद्रपूर : प्रतिनिधी
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथे लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयाची बस हरदोना गावानजीक उलटली. यात सुमारे वीस विद्यार्थी जखमी झाले आहेत. या बसमध्ये ६० विद्यार्थी होते. विद्यार्थ्यांना घेऊन ही बस शाळेकडे निघाली होती. मात्र वाटेत चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयाची बस नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना घेऊन शाळेकडे निघाली होती. बसमध्ये तब्बल ६० विद्यार्थी होते. दरम्यान स्कूल बस हरदोना गावानजीक आली असता चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. चालकाला बस थांबवता आली नाही आणि काही क्षणात बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली.
या अपघातात २० विद्यार्थी जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमी विद्यार्थ्यांना गडचांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. माहिती मिळताच पालकांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरू असून पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.