वर्धा : प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वर्धा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. वर्ध्यात स्टील फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची घटना बुधवारी (७ नोव्हेंबर) उशिरा घडली. या स्फोटात २२ कामगार जखमी झाले असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींना उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या पथकाने आग विझविण्यास सुरुवात केली. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
वर्धा जिल्ह्यातील भूगाव येथील इव्होनिथ स्टील फॅक्टरीमध्ये ही स्फोटाची घटना घडली. कंपनीत मेटल ऑक्साईड आणि सिलिकॉन डायऑक्साईड यांचे मिश्रण असलेल्या स्लॅगच्या कूलिंग प्रक्रियेदरम्यान हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टील प्लांटमध्ये झालेल्या अपघातात किमान २२ कर्मचारी जखमी झाले आहेत. नेहमीप्रमाणे सुमारे २२ कामगार येथे काम करत होते. त्यानंतर अचानक भट्टीत स्फोट झाला. या बॉयलरमधून आगीचे गोळे निघाल्याने हे गोळे लागलेले कामगार जळून खाक झाले. आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या.