31.7 C
Latur
Tuesday, March 25, 2025
Homeलातूरस्त्रियांनी ठरवल्यास जगातलं कुठलंच काम अशक्य नाही 

स्त्रियांनी ठरवल्यास जगातलं कुठलंच काम अशक्य नाही 

लातूर : प्रतिनिधी
सह्याद्री देवराईशी संलग्न होऊन काम करणा-या सनराईज योगा स्टुडिओच्या संचालीका नंदिनी पडिले व पन्नास एक निसर्ग प्रेमी महिलांनी महाराष्ट्रातील जवळपास दुर्मिळ अश्या दोनशे वनस्पतींची माहिती ही एका प्रकल्पा अंतर्गत  एकत्रित करुन ५० फाईल बनवून त्या सह्याद्री देवराईचा पर्यावरण  सन्मान सोहळ्यात सह्याद्री देवराईचे अरविंद जगताप व सुपर्ण जगताप यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी बोलताना अरविंद जगताप यांनी स्त्रियांनी ठरवल्यावर जगातलं कुठलंच काम अशक्य नाही असे प्रतिपादन केले.
दोन महिन्यापूर्वी सह्याद्री देवराईचे सर्वेसर्वा सिने अभिनेते सयाजी शिंदे व सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी या निसर्ग पर्यावरणावर प्रेम करणा-या विविध क्षेत्रातील शिक्षिका, डॉक्टर, गृहिणी अश्या सर्व महिलांची बैठक घेऊन त्यांना हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी  आवाहन केले होते. जवळपास या दोनशे वनस्पतींचे त्यात मास रोहिणी, काळाकुडा, मेंढशिंगी, देवसावर, सोनसावर, शिवण, रान पांगरा, भोकर, हुंब, हेकळ, गोकर्ण, हिवर, उंडी, करवंद, कारं, मोह, पार जांभुळ, शिरीष, अर्जुन, काटेसावर, अश्या  विविध दोनशे वनस्पतींची माहिती  आहे.
ही सर्व  माहिती एकत्रित करुन एक छोटे पुस्तक सह्याद्री देवराई तर्फे तयार करण्यात येत आहे. आणि हे पुस्तक भविष्यात लहान शालेय मुलांना या वनस्पतींचे ज्ञान मिळावं म्हणून शिक्षण विभागाला विनंती करून देण्यात येणार आहे. महाराष्ट्रात या सगळ्या वनस्पतींची बीज संकलन हे महाराष्ट्रातील सहाही विभागात देवराई तर्फे सुरू करण्यात आली आहे. यामध्ये कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भ असे सहा विभाग आहेत. या सहा विभागात बीज महोत्सव करण्याची महत्त्वाची जिम्मेदारी आपल्याला लातूरला मिळाली आहे. या सहाही विभागात सहा झोन वाईज पर्यावरणात काम करणा-या विविध सामाजिक संस्थांच्या सहा टीम बनवण्यात आल्या आहेत असे सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी प्रास्ताविक करताना सांगितले.
कवी लेखक सह्याद्री देवराईचे अरविंद जगताप यांनी पुढे बोलताना या महिलांचे व या प्रकल्पाचे खूप कौतुक केले आणि या सर्व महिला सहका-यांशी संवाद साधला. ते म्हणाले ज्या कार्यात स्त्रीचा सहभाग असतो आणि सहभाग असल्यानंतर जगात कुठलीच गोष्ट अशक्य नाही. फक्त तिला प्रेम आणि सन्मान देता आला पाहिजे तर आपला समाज खूप प्रगत होईल. स्त्रीशक्तीने ठरवल्यावर जगात कुठलंच काम अशक्य नाही असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी सर्व महिलांच्या आग्रहा खातर त्यांनी काही पत्र वाचन देखील केले.
सह्याद्री देवराई तर्फे हा सर्व प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सह्याद्री देवराईच्या नुतन सदस्या तथा सनराईज योगा स्टुडिओच्या संचालिका नंदिनी पडिले यांना सिने अभिनेते सयाजी शिंदे व कवी लेखक अरविंद जगताप यांच्या स्वाक्षरीने लिहिलेले एक सन्मान पत्र अरविंद जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच या प्रकल्पात सहभागी  सहभागी ५० महिला सदस्यांना देखील सन्मानपत्र कवी अरविंद जगताप, द्वारकादास श्याम कुमारचे तुकाराम पाटील, सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ आरती झंवर, राजस्थानी महिला मंडळाच्या अर्चना सोमाणी, रूपाली बोराडे पाटील, सपना मशरु, धवल मशरू, डॉ. बी आर. पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला सह्याद्री देवराई लातूरचे स्थानिक डॉ दशरथ भिसे, भीम दुनगावे, अमृत सोनवणे,  प्रशांत हल्ले, डॉ गणेश गोमारे, हे उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR