मुंबई : सध्या ‘स्त्री २’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या यशामुळे अभिनेत्री श्रद्धा कपूर चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात राज कुमार राव, अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांनी देखील महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाच्या यशानंतर आता अभिनेत्री श्रध्दा कपूर घर बदलणार असल्याचे समोर आले आहे. श्रध्दा आता बॉलीवूड खिलाडी अक्षय कुमारची शेजारी बनणार असल्याची चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री श्रध्दा कपूर लवकरच सी-फेसिंग जुहू अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होणार आहे. याच इमारतीतील अभिनेता अक्षय कुमार डुप्लेक्स अपार्टमेंटमध्ये राहतो. तर अभिनेता हृतिक रोशन देखील याच अपार्टमेंटमध्ये राहतो. याआधी वरुण धवन पत्नी नताशा आणि मुलीसोबत या घरात शिफ्ट होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र काही कारणास्तव तो शिफ्ट झाला नाही. आता श्रद्धा या अपार्टमेंटमध्ये भाड्याने राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ‘स्त्री २’ ची कमाई सतत वाढत आहे. या चित्रपटाने १२ व्या दिवशी १७ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यानुसार चित्रपटाचे कलेक्शन ४४३.५ कोटींच्या वर पोहोचले आहे. तर चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे तर हा चित्रपट ६०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.