मुंबई : प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील अनेक भागात उद्योगपती गौतम अदानी यांचे विविध प्रकल्प सुरू आहेत. आता मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्ट प्रशासनाकडून अदानी कंपनीचे नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात येणार आहे. मात्र, या स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा शिवसेनेनं (उबाठा) केला.
जी वीज वापरली जाणार नाही, ती वापरल्याचं दाखवून ग्राहकांना लुटण्याचा प्रकार केला जाणार असल्याचा आरोप शिवसेनेकडून (उबाठा) केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटीच्या स्मार्ट मीटर विरोधात गुरुवारी (१२ डिसेंबर) शिवसेनेच्या (उबाठा) शिष्ट मंडळाने बेस्ट प्रशासनाची भेट घेत निवेदन दिले. तसेच जोपर्यंत आमच्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर मिळत नाही, तोपर्यंत स्मार्ट मीटर बसविण्याचे थांबवण्यात यावे अशी मागणी करण्यात आल्याचे शिवसेनेचे (उबाठा) आमदार अनिल परब यांनी सांगितले.
बेस्ट प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, पूर्वी जे मीटर होते, त्यामध्ये तुम्ही जेवढी वीज वापरली तेवढंच वीजबिल यायचे. परंतु, आता अदानी कंपनीच्या स्मार्ट मीटरमध्ये एक विशिष्ट चिप बसवण्यात आले. ती चिप कंपनीचे कर्मचारी कार्यालयात बसून ऑपरेट करणार आहेत. त्याच्यात ते फेरफार करून जी वीज वापरली नाही, त्याचेही अव्वाच्या सव्वा वीजबिल लावले जावू शकते. परिणामी स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा ग्राहकांना लुटण्याचा प्रकार आहे. त्यामुळे अदानी कंपनीचे स्मार्ट मीटर बसवण्याचे काम तत्काळ थांबवण्यात यावे, अशी आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली आहे, असे परब यांनी सांगितले.