नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज रविवारी (ता. ३० मार्च) नागपूर दौ-यावर आहेत. या दौ-यानिमित्त पंतप्रधान मोदी नागपुरात पोहोचताच त्यांनी सर्वांत प्रथम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांच्या समाधीचे दर्शन घेतले. महत्त्वाची बाब म्हणजे, तब्बल ११ वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेडगेवार स्मृति भवनात पोहोचले
. यानंतर त्यांनी दीक्षाभूमी येथे जाऊन अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या हस्ते नागपुरात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायाभरणी करण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरएसएस पदाधिका-यांचे कामाचे कौतुक केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ एका महान वटवृक्षाप्रमाणे जगासमोर उभा आहे. हा केवळ एक सामान्य वृक्ष नसून, भारताच्या अमर संस्कृतीचा अक्षय वट आहे. स्वयंसेवक कधी थांबत नाही आणि तो थकतसुद्धा नाही, असे मोदींकडून यावेळी सांगण्यात आले.