मुंबई : कविमनाचे महान योद्धे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणारा पहिला ‘राज्य प्रेरणा गीत पुरस्कार’ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी’ या गीताला देण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस समुद्रकिना-यावरून केली आहे.
या प्रेरणा गीताला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे ‘छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. २ लाख रुपये रोख रक्कम व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.
छत्रपती संभाजी महाराज हे एक उत्तम साहित्यिक आणि संस्कृतचे उत्तम जाणकार होते. त्यांनी संस्कृत भाषेत ‘बुधभूषण’ हा ग्रंथ लिहिला, तर ‘नायिकाभेद’, ‘नखशीख’ आणि ‘सातसतक’ हे ब्रज भाषेत ग्रंथ लिहिले आहेत. त्यामुळेच त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन महाराष्ट्र शासन यावर्षीपासून एका प्रेरणा गीताचा सन्मान करणार आहे.
काव्यपंक्ती जगण्याला प्रेरणा देतात
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास एक मोठा संघर्ष असतो. या संघर्षात संकटसमयी मनाला उभारी देण्याचे काम काव्यपंक्ती करतात, जगण्याला प्रेरणा देतात. म्हणून अशा प्रेरणा गीतांचा सन्मान व्हावा तोही आपल्या स्वराज्यासाठी अफाट संघर्ष करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावे व्हावा अशी यामागची कल्पना असल्याचे मंत्री अॅड. शेलार यांनी सांगितले.