उदगीर : प्रतिनिधी
क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय आयोजित स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी ऐतिहासिक उदगीर शहर सज्ज झाले आहे. क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज ९ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. यावेळी प्रख्यात अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचे नृत्य अविष्कारासह लेझर शो व नयनरम्य आतिषबाजी करण्यात येणार आहे.
९ ते ११ मार्चपर्यंत होणा-या स्पर्धेत १० जिल्ह्यातील ३६ खेळाडू असे एकुण ३६० खेळाडु उदगीर शहरात दाखल झाले आहेत. फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन व महिलांचे संघ मैदानात उतरणार आहे. स्पर्धेतील सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्यांना अनुक्रमे ६० हजार, ५० हजार व ३० हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
स्पर्धेचे उघाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायत राज व पर्यटन मंत्री गिरीष महाजन हे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खा.रामदास तडस, खा.सुधाकर श्रृंगारे, खा.ओमप्रकाश ंिनबाळकर, आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.सुरेश धस, आ.रमेश कराड, आ.अमित देशमुख, आ.संभाजी पाटील निलंगेकर,आ.बाबासाहेब पाटील, आ.धिरज देशमुख, आ.अभिमन्यू पवार यांच्यासह अधिकारीउपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपसंचालक युवराज नाईक, उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव पै.योगेश दोडके, उपसंचालक जगन्नाथ लकडे, जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव शिवरुद्र पाटील यांनी केले आहे.