कूचबिहार : वृत्तसंस्था
बांगलादेशात सध्या हाहाकार माजला असून याठिकाणी हिंसक आंदोलनकर्ते हिंदूंना लक्ष्य करत आहेत. हिंदू समुदायाची घरे, मंदिरांवर बांगलादेशात हल्ले सुरू आहेत त्यामुळे बांगलादेशात राहणारा हिंदू भारत बांगलादेश सीमेवर कूचबिहार जिल्ह्यातील काटेरी तारांच्या पलीकडे मोठ्या संख्येने जमले आहेत. ही परिस्थिती पाहता बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या १५७ तुकड्या सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत.
बांगलादेशात राहणारे हिंदू काटेरी तारांपासून ४०० मीटर अंतरावर गैबंडा जिल्ह्यातील गेंडुगुरी, दैखवा गावात एकत्रित आले आहेत. शुक्रवारी सकाळपासून हे लोक इथं जमण्यास सुरुवात झाली. दुसरीकडे कूचबिहारच्या सीमेअलीकडे शीतलकुचीच्या पठानटुली गावात बीएसएफच्या जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश सीमेवर देखरेख ठेवण्यासाठी समितीची स्थापना केली आहे. ही समिती बांगलादेशातील समकक्ष अधिकारी यांच्याशी संपर्कात राहतील. जेणेकरून तिथे राहणा-या भारतीय नागरीक, हिंदू आणि अन्य अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची हमी घेतली जाईल.
पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी इथे भारत बांगलादेश बॉर्डरवर १ हजाराहून अधिक बांगलादेशी हिंदू पोहचले आहेत. त्यांना भारताच्या सीमेत प्रवेश करायचा आहे. मात्र भारताने बेकायदेशीर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. या प्रकारामुळे भारत-बांगलादेश सीमेवर जवानांची संख्या वाढवण्यात आली आहे.
भारताने शरण देण्याची मागणी
सीमेपलीकडे एकत्रित जमलेल्या बांगलादेशी हिंदूंनी म्हटलं की, आमची घरे, मंदिरे जाळण्यात येत आहेत त्यामुळे आम्हाला भारतात शरण यायचं आहे. मात्र भारतात इतक्या मोठ्या संख्येने शरण येण्यासाठी जमलेल्या लोकांना भारतीय जवानांनी सीमेवरच रोखून धरले आहे.