मुंबई : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष निर्घृण हत्येबाबत आणि बीड जिल्ह्यातील पोलिसांची असलेली पक्षपाती भूमिका याबद्दल आज काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह इतर नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, तसेच वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याची माहिती दिली.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी होत असलेली एसआयटीची चौकशी निष्पक्षपणे होण्यासाठी आणि आरोपींना शिक्षा होण्याच्या दृष्टीने त्या सर्वांच्या जवळचा माणूस सत्तेत असेल तर तो ही चौकशी निष्पक्षपणे होऊ देणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. दुसरे म्हणजे या हत्येचा तपास करण्यासाठी जी एसआयटी नेमण्यात आली आहे त्यातील ८ ते १० अधिका-यांचा बीड जिल्ह्याशी संबंध आहे आणि आरोपीसोबत सुद्धा त्यांची घनिष्ठ ओळख आहे. अशावेळेस हत्येची चौकशी निष्पक्ष होण्याची शक्यता दिसत नाही. म्हणून आम्ही या अधिका-यांना बदलण्याची मागणी केली आहे, अशी माहिती वडेट्टीवार यांनी केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, वाल्मिक कराडवर आता खंडणीचा गुन्हा दाखल आहे. प्रकरण मुळात खंडणीपासून सुरू झाली आहे. ज्यावेळेस खंडणी देण्यास नकार देण्यात आला, त्यावेळेस त्या कंपनीच्या चौकीदाराला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा चौकीदार दलित समाजाचा होता. त्यामुळे त्या गावच्या सरपंचाने जाऊन तिथे या सगळ्यांना दमदाटी केली आणि यांना पळवून लावले. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, ही सुद्धा मागणी आम्ही राज्यपालांकडे केली आहे.