19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeछत्रपती संभाजीनगरहाकेंचे उपोषण स्थगित

हाकेंचे उपोषण स्थगित

सरकारचे आश्वासन, शिष्टमंडळाच्या विनंतीनंतर उपोषण तूर्त मागे

जालना : प्रतिनिधी
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव उपोषण अखेर लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी स्थगित केले. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील. सरकारने सध्या आश्वासन दिले आहे. त्यामुळे आम्ही उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे, असे हाके म्हणाले.

राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते. यामध्ये गिरीष महाजन, धनजंय मुंडे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे आदी नेते उपस्थित होते. या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे, याची माहिती दिली. त्याचवेळी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपले उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली. यावेळी भुजबळ यांनी आपल्या मागण्याबाबत सरकार गंभीर आहे, त्याशिवाय सकारात्मक चर्चा झाली आहे, असा विश्वास हाके यांना दिला.

त्यावर हाके यांनी बोगस सर्टिफिकेट देणा-यांवर आणि घेणा-यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले. त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावे. या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे. पंचायत राजच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनाने स्पष्ट करावे, असे म्हटले.

अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल. या सरकारने आश्वासन दिले आहे. पण केवळ त्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आमच्या मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे. आता ते फक्त तात्पुरते स्थगित केले आहे, असे उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सांगितले. दरम्यान, हाके आणि वाघमारे यांनी उपोषण मागे घेताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आभार मानले.

आपल्याला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. दलित आदिवासी समाज तुमच्यासोबत आहे. राज्यात अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटले. ज्यांनी खोटे दाखले वाटले, त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार आहेत. खोटे दाखले देणा-यांवर गुन्हा दाखल होईल. पूर्वीचे जे नियम आहेत, ते सुप्रीम कोर्टाच्या नियमांनुसार आहेत, असेही भुजबळ म्हणाले.

दादागिरी चालणार नाही : भुजबळ
राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी आमच्यावरचा अन्याय कधी संपणार? आता त्यांची दादागिरी चालणार नाही. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावेत, यासाठी आरक्षण आहे, असे म्हटले लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पाडले. पण लढाई संपली नाही. आम्ही कुणालाही घाबरत नाही. यापुढे लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल, असे म्हटले.

हाकेंच्या मागण्या
-ओबीसी, भटक्या-विमुक्त जाती-जमातीच्या मूळ आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये. तसे लेखी आश्वासन द्यावे
-कुणबीच्या लाखो बोगस नोंदीची त्वरित दखल घेवून त्या रद्द कराव्यात
-ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाना आर्थिक तरतूद व्हावी
-ओबीसीच्या वसतिगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित व्हावी.
-ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR