28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसंपादकीयहिंदुत्वाचे अपचन!

हिंदुत्वाचे अपचन!

निवडणुकीच्या प्रचारात उपस्थित होणा-या कुठल्याही अडचणीच्या मुद्याला आपण धार्मिक ध्रुवीकरणाच्या हुकमी एक्क्याने बगल देऊ शकतो, तेवढी आपली हिंदुत्वाची मतपेढी ‘स्ट्राँग’ आहे, हीच भाजपची निवडणुकीची रणनीती राहिलेली आहे. त्याच जोरावर भाजपने देशातल्या सत्तेच्या चाव्या मिळवलेल्या आहेत. नाही म्हणायला या हिंदुत्वाच्या हुकमी एक्क्याला प्रचारात कधी विकासाची तर कधी राष्ट्रवादाची जोड देण्याचे चातुर्य भाजपने दाखविले आहे. त्यातूनच २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजयही मिळवला. मात्र, कुठलीही गोष्ट अति झाली की, त्याची माती होते हा सृष्टीचा नियमच आहे. भावनिक मुद्यांचा आधार घेऊन एकदा, दोनदा जनतेची दिशाभूल करता येते. मात्र, जनतेला जेव्हा त्यांच्या रोजच्या जगण्यातील समस्यांचे चटके बसतात तेव्हा त्यावर हे भावनिक मुद्दे उपचार ठरू शकत नाहीत.

अत्यंत आत्मविश्वासाने ‘चारसौ पारची’ घोषणा देऊन तिस-या सलग सत्तारोहणास आतुर झालेल्या भाजपच्या ‘अजेय जोडी’ला निवडणूक निकालाने वास्तवाचे चटके दिल्यावर मोदी-शहांना त्याची जाणीव झाली असेलच! त्यामुळेच मोदींनी निकालानंतरच्या पहिल्याच भाषणात आपली भाषा बदलून ‘एनडीए’ सरकारचा उल्लेख वारंवार केला आणि नितीशकुमार व चंद्राबाबू यांच्यावर स्तुतिसुमनेही उधळली. असो! हा राजकारणाचा भाग झाला. हे सहमतीचे राजकारण परस्परांच्या गरजेवर अवलंबून असते व त्याचा पुरेपूर अनुभव भाजप, नितीशकुमार, चंद्राबाबू यांनी घेतलेला आहे व परस्परांना दिलेलाही आहे. त्यामुळे त्यावर भाष्य निरर्थकच! मूळ मुद्दा आहे तो मतदारांनी भाजपला दिलेल्या संदेशाचा! हा संदेश हेच सांगतो की, जरी मतदारांचे आजही हिंदुत्वाच्या मुद्यावर प्रेम असले तरी त्याच्या अतिरेकाने आता त्यांना या मुद्याचे अपचन होते आहे.

त्यामुळे भाजपला आपला जनाधार टिकवायचा तर सामान्यांचे रोजच्या जगण्यातले प्रश्न, समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. केवळ स्वप्नरंजनावर जनता भाळणार नाही तर त्यांच्या जगण्याचे प्रश्न सरकारला गांभीर्याने घ्यावे लागतील. भाजपकडून या निवडणूक प्रचारात विकासाचा दावा केला गेला. मात्र, मतदारांनी त्याची योग चिकित्सा करून भाजपला आरसा दाखविला. भाजपने बहुसंख्यवादातून जी दहशत देशात निर्माण केली त्याची तेवढीच जोरदार प्रतिक्रिया मुस्लिम, दलित मतदारांनी दिली. महाराष्ट्रात पक्ष फोडाफोडीचे जे राजकारण झाले ते मतदारांना अजिबात भावले नाही. त्याचीही कडक प्रतिक्रिया मतदारांनी भाजपला दिली. त्याच्या परिणामी ‘मी पुन्हा येईन’ म्हणणा-या फडणवीसांना ‘मी पुन्हा जाईन’चा राग आळवावा लागतो आहे.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात नेतृत्वबदल पक्षासाठी योग्य नसल्याचे भाजप श्रेष्ठींच्या लक्षात आल्याने तूर्त फडणवीसांचे उपमुख्यमंत्रिपद व राज्याचे नेतृत्व कायम राहिले असले तरी पक्षात एककल्ली कारभार चालणार नाही, सर्वांना सोबत घेऊन सहमतीने काम करावे लागेल, हा संदेश फडणवीसांना मिळाला आहेच. प. बंगालमध्ये संदेशखाली प्रकरणावरून भाजपने ध्रुवीकरणाचा मोठा प्रयत्न केला होता व यावेळी भाजप प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला धोबीपछाड देणार असेच वातावरण निर्माण करण्यात आले होते. मात्र, मतदारांनी भाजपला तेथेही जमिनीवर आणले. राममंदिराचे उद्घाटन करून करण्यात आलेल्या वातावरणनिर्मितीने उत्तर प्रदेश एकहाती जिंकू असा आत्मविश्वास भाजपला होता. मात्र, मतदारांनी तेथेही भाजपला जबरदस्त तडाखा दिला. एकंदर हिंदुत्वाचे अपचन मतदारांना झाले आहे, हेच मतदारांनी निकालातून भाजपला दाखवून दिले आहे.

त्यामुळेच भाजप व या पक्षाची मातृसंस्था रा. स्व. संघाची भाषा आता बदललेली दिसते आहे. सरसंघचालकांनी भाजपच्या ‘अजेय जोडी’चे निकालानंतर बौद्धिक घेताना मणिपूर प्रकरणावरून सरकारला व मोदींना अत्यंत खडे बोल सुनावले! केवळ धु्रवीकरणाच्या हट्टापायी भाजपने मणिपूरमधील मैतेई समाजाची पाठराखण करणा-या मुख्यमंत्र्यांना मूक पाठिंबा दिला व हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. त्याच्या परिणामी मणिपूरमधल्या दोन्ही लोकसभा जागा भाजपला गमवाव्या लागल्या. आता चूक लक्षात आलेल्या भाजपने मणिपूरचा हिंसाचार थांबविण्याकडे लक्ष वळवले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मैतेई व कुकी या दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींसोबत एकत्रित बैठक घेतली आणि या बैठकीपासून उघडपणे मैतेई समाजाची पाठराखण करणा-या मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांना दूर ठेवण्यात आले. अर्थात या प्रयत्नांना आता बराच उशीर झाला असल्याने अशा बैठकांनी मणिपूरची आग लगेच विझण्याची शक्यता कमीच!

त्यासाठी केंद्र सरकारला ठोस प्रयत्न करावे लागतील. सर्वसमावेशक धोरण अंगिकारून दोन्ही जमातीच्या जनतेला विश्वासात घ्यावे लागेल आणि त्यासाठीचे पहिले ठोस पाऊल म्हणून मैतेईंची उघड पाठराखण करणा-या मुख्यमंत्र्यांना तात्काळ पदावरून दूर करावे लागेल. भाजप ही शस्त्रक्रिया करण्याची हिंमत कधी दाखविणार याकडे मणिपूर व देशाच्या जनतेचे लक्ष लागले आहे. एकंदर धु्रवीकरणाच्या अतिरेकी राजकारणात सामान्य जनतेला स्वारस्य राहिलेले नाही तर त्यांना स्वत:च्या पोटापाण्याचे, रोजगाराचे, सामाजिक शांततेचे प्रश्न जास्त प्राधान्याचे असल्याचे कळले आहे हे निवडणूक निकालातून मतदारांनी भाजपला स्पष्टपणे सांगितले आहे. त्यामुळे या सरकारला आता केवळ निवडणूक प्रचारापुरते नव्हे तर प्रत्यक्ष कारभारातही ‘सबका साथ सबका विकास, सबका विश्वास’ हेच धोरण अवलंबावे लागेल अन्यथा लोकसभा निवडणूक निकालाच्या संदेशाची पुनरावृत्ती यापुढील प्रत्येक निवडणुकीत होत राहील, हे मात्र निश्चित!

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR