पुणे : प्रतिनिधी
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली असली तरीही हे वादळ प्रत्यक्षात सक्रिय असल्याच्या तुलनेत ते शमल्यानंतर दिसणारे परिणाम अधिक गंभीर असल्याचे स्पष्ट होत आहे. इथे वादळाची तीव्रता कमी होत असल्याचे चित्र असले तरीही महाराष्ट्रावर मात्र सातत्याने हवामान बदलांचा मारा होताना दिसत आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अगदी अखेरच्या दिवसापर्यंत ज्या महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीने मुक्काम ठोकला होता त्याच राज्यावर आता पावसाचे ढग घोंघावताना दिसत आहेत.
राज्यातील उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता उर्वरित भागांमध्ये तापमान १७ अंशांच्याही पलिकडे पोहोचले आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद रत्नागिरीमध्ये करण्यात आली असून, कोकणातील सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर क्षेत्रामध्ये वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सांगली, सातारा, पाचगणी आणि महाबळेश्वर इथेही वातावरण ढगाळ राहणार असले तरीही या भागांमध्ये काही प्रमाणात हवेतील गारठा जाणवणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
फेंगल चक्रीवादळाची तीव्रता कमी होत असतानाच कर्नाटकच्या किनारपट्टी क्षेत्रामध्ये कमी दाबाचा एक पट्टा सक्रिय असल्याचे पाहायला मिळत आहे. ज्यामुळे महाराष्ट्रामध्ये हिवाळ्यातही थंडीसाठी नव्हे, तर पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. परिणामी राज्यात तापमानवाढ पाहायला मिळणार असून, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान विभागाने विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा इशारा दिला आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूरसाठी मात्र पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबईकरांनाही थंडीची प्रतीक्षा
चक्रीवादळाचा परिणाम मुंबईच्या हवामानावरही होताना दिसत असून, शहरात आता कुठे लागलेली थंडीची चाहूलही नाहीशी होताना दिसत आहे. पुढील काही दिवस हे चित्र कायम राहील, ढगाळ वातावरणामुळे पावसाची चाहूलही लागेल. पण, पाऊस बरसणार मात्र नाही असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीच्या वृत्तानुसार यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अपेक्षित थंडी पडणार नसून, डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यानच्या काळातही थंडीचे प्रमाण कमीच राहणार आहे. त्यामुळे यंदा हवामानाचे अनपेक्षित रूप सर्वांनाच हैराण करताना दिसत आहे.