लातूर : प्रतिनिधी
असंख्य बलिदानांनी भारत देश व मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले. या लढ्यात यातना भोगलेले असंख्य लोक आहेत. परंतु, आजवर हा इतिहास सांगण्याची हिंमत कोणी केली नाही. आता पुस्तकातून हा इतिहास मांडला जात आहे. या स्वातंत्र्य संग्रामाचा संपूर्ण इतिहास एकत्र करण्याची गरज आहे, असे मत राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी व्यक्त केले.
नवनिर्माण प्रतिष्ठानच्या वतीने ‘भारतीय स्वातंत्र्यांचा दुसरा लढा’ या प्रवीण सरदेशमुख लिखित पुस्तकाचे प्रकाशन तसेच राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याचे आयोजन दि. २८ सप्टेंबर करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्यपाल बागडे बोलत होते. मंचावर माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार रमेश कराड, डॉ. उपेंद्र कुलकर्णी, नवनिर्माण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण सरदेशमुख, सुधीर धुतेकर, कार्यवाह अशोक शिवणे, शैलेश कुलकर्णी, कोषाध्यक्ष उमेश कुलकर्णी, प्राजक्ता सरदेशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले की, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा संपूर्ण इतिहास एका पुस्तकात मांडणे शक्य नाही. त्यासाठी ग्रंथमाला तयार करावी लागेल. देशाच्या तुलनेत मराठवाड्याला उशिरा स्वातंत्र्य मिळाले. १८५७ पासूनचा इतिहास आपणास माहित आहे. परंतु हा लढा त्यापूर्वीही सुरु होता. असंख्य क्रांतीकारकांनी तो सुरुच ठेवला.अखंड भारताला स्वातंत्र्य मिळावे असा ठराव काँग्रेसनेही १९२९ सालीच केला होता. परंतु प्रत्यक्षात खंडित स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर निजामाच्या राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी पोलीस अॅक्शन करावी लागली, असेही बागडे म्हणाले.
यावेळी आमदार संभाजी पाटील, आमदार कराड, पत्रकार अरुण समुद्रे, उपेंद्र कुलकर्णी यांची भाषणे झाली. प्रास्ताविकात प्रवीण सरदेशमुख यांनी नवनिर्माण प्रतिष्ठानची २५ वर्षांची वाटचाल सांगताना हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते रौप्य महोत्सवी वर्षाचा शुभारंभ होणे ही गौरवाची बाब असल्याचे सांगितले. ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ या पुस्तकाच्या लेखनामागील भूमिका त्यांनी विषद केली. प्रवीण सरदेशमुख, शैलेश कुलकर्णी, सुधीर धुतेकर, उमेश कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. राज्यपाल बागडे व मान्यवरांच्या हस्ते ‘भारतीय स्वातंत्र्याचा दुसरा लढा’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
राज्यपाल बागडे यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे नातेवाईक,ज्येष्ठ व्यक्ती व राष्ट्रीय विचाराने कार्य करणा-या संस्था पदाधिका-यांचा सत्कार करण्यात आला. दयानंद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रल्हाद माले व राजश्री कुलकर्णी यांनी केले. अशोक शिवणे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.