प्रयागराज : वृत्तसंस्था
महाकुंभानिमित्त तब्बल १२५ पेक्षाही अधिक देशांचे भाविक, पर्यटक प्रयागराजला हजेरी लावतील, असा अंदाज आहे. परदेशी पर्यटकांना मुळात भारताचं, भारतीय अध्यात्माचं आकर्षण, त्यात महाकुंभ म्हणजे तर या सगळ्यांचा कळस. ही ‘पर्वणी’ साधण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येण्यासाठी उत्सुक आहेत. जवळपास एकूण ४० कोटी भाविक या महाकुंभला हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यात लाखो परदेशी भाविक असतील.
महाकुंभासाठी जगभरातील टुर ऑपरेटर्सकडे पर्यटकांनी रांगा लावल्या आहेत. त्यातही पर्वण्यांच्या तारखांना बुकिंग प्रचंड मोठ्या प्रमाणावर आहे. यंदाच्या प्रयागराज महाकुंभानिमित्त अनेक लहान-मोठ्या देशांसह अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, फ्रान्स, संयुक्त अरब अमिरात, युरोप मधील सुमारे एक हजारपेक्षाही अधिक टुर ऑपरेटर्सनी उत्तर प्रदेश पर्यटन विभागाशी संपर्क साधला. अनेक परदेशी पर्यटक आधीच भारतात दाखल झाले आहेत.
शाहीस्रानाची आस!
दर १२ वर्षांनी हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयागराज येथे कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. १२ कुंभमेळ्यांचं एक चक्र पूर्ण झाल्यानंतर महाकुंभ आयोजित केला जातो. म्हणजेच दर १४४ वर्षांनंतर महाकुंभ येतो. या ऐतिहासिक महाकुंभाचं आयोजन यंदा प्रयागराज येथे करण्यात आलं आहे. त्यामुळे त्याला आत्यंतिक महत्त्व आहे. कुंभमेळ्यातील शाहीस्रानांचं महत्त्व तर अपरंपार. शाहीस्रानाची आणि मोक्षप्राप्तीची संधी आपल्यालाही मिळावी, यासाठीही परदेशी भाविक प्रचंड इच्छुक आहेत.