लातूर : प्रतिनिधी
अहमदपूर तालुक्यातील अहमदपूर ते टेंभुर्णी रस्त्यावरील एका पुलाखाली चोरीतील सोन्याचे दागिने विक्री करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या दोघांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरच्या स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने अटक करून त्यांच्याकडून २०६ ग्रॅम सोन्यासह रोख रक्कम असा एकूण १५ लाख २३ हजार १९२ रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. या टोळीने सुमारे १७ घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने भारत गोविंद शिंदे उर्फ अशोक समिंदर शिंदे रा. बोरी, ता. जिंतूर हा. मु. फुरसुंगी हडपसर व अविनाश किशन भोसले रा. नायगाववाडी, ता. नायगाव, जि. नांदेड यांना ताब्यात घेवून चौकशी केली असता ते दोघे व इतर साथीदारांनी लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखा, लातूर जिल्ह्यातील वाढवणा, चाकूर, किल्लारी, रेणापूर, लातूर ग्रामीण आदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे १७ घरफोड्या केल्याचे उघड झाले. त्यांच्या ताब्यातून वरीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वंभर पल्लेवाड, पोलीस अमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजेश कंचे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, प्रदीप स्वामी, जमीर शेख, संतोष खांडेकर नकुल पाटील, अंगुली मुद्रा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पुणेकर, पोलीस अमलदार धनंजय गुट्टे, फोटोग्राफर सुहास जाधव, सायबर सेलचे पोलीस अमलदार संतोष देवडे, गणेश साठे, शैलेश सुडे यांनी केली आहे.