मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळाले. याचे सर्वाधिक श्रेय हे लाडकी बहीण योजनेला जात असल्याचे समोर आले. पण याचा लाडकी बहीण योजनेवरून निकालानंतरही विरोधकांकडून अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहेत. अशामध्ये आता लाडकी बहीण योजनेमधील १६ लाख अर्जांची छाननी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या आचारसंहितेआधी १६ लाखांची छाननी बाकी होती. ती आता पूर्ण केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यापैकी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत राज्यातील २ कोटी ३४ लाख लाभार्थ्यांना लाडकी बहिणी योजनेचा फायदा मिळाला आहे.
त्या १६ लाख अर्जांची छाननी झाल्यानंतर एकूण संख्येत आणखी वाढ होणार आहे. दरम्यान, विरोधकांनी या संदर्भात सत्ताधा-यांवर निशाणादेखील साधला होता. निवडणुकीनंतर थांबवलेले हप्ते पुन्हा कधी सुरू होणार? महायुतीने आश्वासन दिलेले २१०० रुपये लाडक्या बहिणींना कधीपासून सुरू होणार? यावरून अनेक सवाल विरोधकांनी केले आहेत.
अदिती तटकरेंनी दिली होती ही माहिती
विरोधकांच्या टीकेनंतर महायुतीच्या नेत्या अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना आवाहन केले होते. त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या अंदाजे २ कोटी ३४ लाख लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांची कोणत्याही प्रकारची छाननी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या योजनेसंदर्भात कोणत्याही लेखी पद्धतीच्या सूचना, कोणतेही आदेश, शासन निर्णय, निकष बदल विभागाने काढलेले नाहीत. विनाकारण काही अफवा पसरवल्या जात असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले आहे.