परभणी : शहरातील शनिवार बाजार येथील मुख्य पोस्ट ऑफीस कार्यालयात कामानिमित्त येणा-या नागरीकांची अडवणूक करण्यात येत आहे. या ठिकाणी स्पीड पोस्ट करण्यासाठी येणा-या नागरीकांना ४१, ५२ किंवा ७३ रूपये असे ऑड चार्जेस लागत असल्यास त्यांच्याकडून वरील चिल्लरसाठी पोस्ट कर्मचारी १० रूपये ठेवून घेत आहेत.
१ रूपया किंवा वरील २, ३ रूपये आणून द्या आणि तुमचे १० रूपये घेवून जा असे खिडकी क्रमांक १ वरील कर्मचारी बिनधास्त नागरीकांना सांगत असून पोस्ट खात्याच्या या अफलातून योजनेबद्दल नागरीकांमध्ये मात्र तीव्र रोष व्यक्त होताना दिसून येत आहेत.
परभणी शहरातील मुख्य पोस्ट कार्यालयात नोकरीचे अर्ज, पार्सल पाठवण्यासाठी नागरीक मोठ्या प्रमाणात येत असतात. या ठिकाणी खिडकी क्रमांक १ वर पार्सल पाठवण्याची सुविधा आहे. परंतू ग्राहकांना राऊंड फिगर रकमेच्यावर चार्जेस लागत असल्यास वरील चिल्लरसाठी अडवणूक केली जात आहे. खिडकी क्रमांक १चे कर्मचारी वरील चिल्लरसाठी नागरीकांचे १० रूपये ठेवून घेत असून चिल्लर आणून दिल्यास परत देवू असे सांगत आहेत. याबद्दल नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून पोस्ट मास्तर यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे