23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूर२०९ मी. मी. पाऊस पडूनही १४४ प्रकल्पांत ७.५३ टक्के पाणीसाठा

२०९ मी. मी. पाऊस पडूनही १४४ प्रकल्पांत ७.५३ टक्के पाणीसाठा

लातूर : प्रतिनिधी
यंदाच्या पावसाळ्याची दमदार सुरुवात झाली. पावसाळा सुरु होऊन आता १५ ते २० दिवस होत आले आहेत. या दरम्यान जिल्ह्यात २०९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. परंतू, अद्यापही जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांत केवळ ७.५३ टक्के पाणीसाठा आहे. विशेष म्हणजे ८४ प्रकल्प जोत्याखाली तर ९ प्रकल्प कोरडे आहेत. त्यामुळे येत्या काळात सलग आणि मोठ्या पावसांची नितांत गरज आहे.
गेल्या वर्षीच्या तूलनेत या वर्षी जिल्ह्यातील धरणात अत्यंत कमी पाणीसाठा आहे. मांजरा व निम्न तेरणा या दोन मोठ्या धरणांपैकी लातूर शहराला पाणीपुरवठा होणा-या मांजरा धरणात अद्यापही उपयुक्त पाणीसाठा शुन्य आहे. निम्न तेरणा प्रकल्पात १४.०० टक्के पाणीसाठा आहे. मांजरा व निम्न तेरणा या दोन मोठ्या प्रकल्पात एकुण ४.७६ टक्के पाणीसाठा आहे. तावरजा, रेणापूर, व्हटी, तिरु, देवर्जन, साकोळ, घरणी आणि मसलगा या आठ मध्यम प्रकल्पांपैकी तावरजा, व्हटी, तिरु हे तीन प्रकल्प कोरडे असून रेणापूर मध्यम प्रकल्पात २२.८२ दशलक्ष घनीटर, देवर्जन प्रकल्पात २.८९ दशलक्ष घनमीटर, साकोळ प्रकल्पात ३.११ दशलक्ष घनमीटर, घरणी प्रकल्पात ३.७७ दशलक्ष घनमीटर तर मसलगा प्रकल्पात ४९.८२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आठ मध्यम प्रकल्पात एकुण १०.५२ टक्के पाणीसाठा आहे. तर जिल्ह्यातील १३४ लघू प्रकल्पांत ८.७२ टक्के असे एकुण १४४ प्रकल्पांत केवळ ७.५३ टक्के पाणीसाठा आहे.
जलसंपदा विभागाच्या अहवालानूसार जिल्ह्यातील ८४ प्रकल्प अद्यापही तळालाच आहेत ९ प्रकल्प कोरडे आहेत. लातूर, धाराशिव व बीड या ती जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेला केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा प्रकल्पाने तळ गाठलेला आहे. मांजरा प्रकल्पात गेल्या वर्षी याच तारखेला २०.२५ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. आजघडीला तो शुन्यावर आहे.
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत २०९.२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. परंतू, धरणसाठ्यात मात्र वाढ झालेली नाही. या पावसाचे जमिनीतील पाणीपातळीत काहींसी सुधारणा झाली आहे. परिणामी कोरड्या पडलेल्या विहिरी, विंधन विहिरींना काही प्रमाणात पाणी आले आहे. या पावसाने जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्त्रोताला पाणी आले. त्यामूळे गेल्या आठ दिवसांत उपविभाीय अधिकारी यांनी जिल्ह्यातील १६ टँकर बंद केले आहेत. जिल्ह्यात ज्या भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही, अशा ठिकाणी अद्यापही २८ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात अद्यापही पाणीटंचाई जाणवत आहे. येत्या काळात विशेषत: धरण पाणलोट क्षेत्रात सलग आणि मोठ्या पावसांची नितांत गरज आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR