28.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमहाराष्ट्र२० लाख शेतकरी बहिणी ‘अपात्र’

२० लाख शेतकरी बहिणी ‘अपात्र’

राज्य सरकारचा झटका, ‘डीबीटी’, ‘नमो योजने’मुळे फटका

मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेत अपात्र असणा-या महिलांकडून पैसे वसूल करण्याचे धोरण अवलंबले असून पैसेदेखील वसूल केले जात आहेत. या योजनेतील निकषांचा थेट राज्यातील २० लाख शेतकरी महिलांना फटका बसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने आधी लाडक्या ठरवलेल्या महिला आता नावडत्या झाल्याची चर्चा शेतक-यांमधून होताना दिसत आहे.

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येण्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मोठा वाटा आहे. यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांतील नेत्यांनी राज्यातील महिलांचे आभार मानले होते. पण आता सरकारने योजनेच्या निकषांवर बोट ठेवत लाखो महिलांना अपात्र करण्याचा सपाटाच लावला आहे. विधानसभेच्या आधी राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेतून २ कोटींहून अधिक महिलांना साडेसात हजार रुपये देण्यात आले होते. त्यावेळी विरोधकांनी ही योजना निवडणुकीसाठीच आहे. यानंतर निकषांच्या नावाखाली काटछाट केली जाईल अशी शक्यता वर्तवली होती. आता ही शक्यता सत्यात येत असून राज्य सरकारने ५ निकषांवर अर्जांची छाननी करणे सुरू केले आहे. यामुळे याच्याआधी ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या. त्या जर निकषांत बसल्या नाहीत तर त्या अपात्र ठरणार आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर मध्य प्रदेश सरकारने ‘लाडली बहना’ सुरू केली. तेथे भाजपला मोठे यश मिळाले. यानंतर तत्कालीन शिंदे सरकारने महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आखली आणि महिलांना १५०० रुपये थेट खात्यावर देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीआधी सरकारने कोणतेही निकष न लावता २ कोटी ६३ हजार महिलांचे अर्ज स्वीकारले तर २ कोटी ४६ लाख महिलांना खात्यावर थेट पाच हप्ते वर्ग केले. तर २ कोटी ५२ लाख महिलांना पात्र ठरविण्यात आले होते. पण आचारसंहितेच्या कारणास्तव या योजनेचे हप्ते थांबवण्यात आले होते. पण आता पुन्हा एकदा पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली असून डिसेंबर महिन्याचा हप्ताही देण्यात आला आहे. आजअखेर २१ हजार ६०० कोटी रुपये लाडक्या बहिणींना देण्यात आले आहेत.

२० लाख शेतकरी लाभार्थी महिला
योजनेतील निकषांप्रमाणे राज्यातील २० लाख शेतकरी महिलांना याआधी जर ‘डीबीटी’ आणि ‘नमो योजने’चा लाभ मिळालेला आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे या योजनेतील २० लाख शेतकरी महिलांच्या लाभात कपात होणार असून या महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत मिळणा-या वार्षिक १८ हजार रुपयांऐवजी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या १२ हजार रुपयांचाच लाभ मिळणार आहे.

माहिती आधीच घेतली
राज्य सरकारने योजनेची घोषणा करण्याआधीच निकषांवर काम सुरू केल्याचे आता समोर येत आहे. या योजनेत शेतकरी महिलांसाठी लावलेल्या निकषांची पडताळणी करण्यासाठी सरकारने ‘डीबीटी’ आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेतील लाभार्थी महिलांची आकडेवारी आधीच मिळवली होती. कृषी आयुक्तालयातून याबाबतची माहिती आधीच महिला व बालविकास विभागाला देण्यात आली होती.

६ हजारांच्या लाभाला कात्री
या माहितीप्रमाणे डीबीटी योजनेतील महिला अर्जदार १० लाख ९० हजार ४६५ होत्या. यापैकी लाडकी बहीण योजनेसाठी १ लाख ७१ हजार ९५४ पात्र ठरल्या होत्या तर नमो शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत वार्षिक ६ हजार रुपये देण्यात येतात. या योजनेसाठी १९ लाख २० हजार ८५ पैकी १८ लाख १८ हजार २२० महिला योजनेसाठी पात्र ठरल्या तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत १८ हजार रुपयांऐवजी १२ हजार रुपये प्रतिशेतकरी महिला देण्यात येणार आहेत. यामुळे अनेक शेतकरी महिलांच्या ६ हजारांच्या लाभाला आता कात्री लागणार आहे.

धुळ्यातील महिलेची रक्कम घेतली परत
धुळ्यातील एका महिलेचे पैसे परत घेण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेचे ७५०० रुपये परत घेण्यात आले आहेत. या महिलेने सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचे चौकशीत आढळले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली असून लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिला आतापर्यंत देण्यात आलेले ५ महिन्यांचे साडेसात हजार रुपये परत घेण्यात आले असून ते सरकारजमा करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR