22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्र२५ महिलांना पाठवली अश्लील ऑडिओ टेप

२५ महिलांना पाठवली अश्लील ऑडिओ टेप

विकृताला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मुंबई : प्रतिनिधी
मुंबई पोलिसांनी एका विकृताला बेड्या ठोकल्या आहेत. मुंबईतील २५ महिलांना त्याने अश्लील ऑडिओ टेप पाठवली. याप्रकरणी निर्मल नगर पोलिस ठाण्यात आयटी अ‍ॅक्ट आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी जास्त शिकलेला नसला तरी त्याला तंत्रज्ञानाची चांगली माहिती होती.

त्यामुळे तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनी अखेर त्याच्या मुसक्या आवळल्या. पोलिस आता पुढील तपास करत आहेत.

मोहम्मद अजीज मोहम्मद निसार खान (३६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशचा असून वांद्रे येथील बेहरामपाडा भागात पराठ्याचे दुकान चालवतो. वांद्रे पूर्व येथील एका ३० वर्षीय गृहिणीला १४ जून रोजी एका अनोळखी क्रमांकावरून तिच्या मोबाईल क्रमांकावर कॉल आला आणि कॉलरने अश्लील बोलण्यास सुरुवात केली.

महिलेने फोनवर त्याच्यावर आरडाओरडा केल्यावर आरोपीने तिला अश्लील ऑडिओ टेप पाठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती घाबरली, सुरुवातीला तिने दुर्लक्ष केले, मात्र आरोपी वारंवार त्रास देत असल्याने तिने हा प्रकार पतीला सांगितला. यानंतर निर्मल नगर पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमंत शिंदे यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.

आरोपी कमी शिकलेला असला तरी त्याला मोबाईल तंत्रज्ञानाची बरीच माहिती आहे, असे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी खानला बेहरामपाडा परिसरातून अटक केली, यावेळी आरोपीकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आले. आरोपीच्या मोबाईलच्या तपासात तो मुंबईतील २५ महिलांना अशा प्रकारे त्रास देत असल्याचे समोर आले आहे. आरोपी विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR