गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दोन्ही महिला नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले होते. यामध्ये प्रमिला सुखराम बोगा ऊर्फ मंजुबाई (३६, रा. बोगाटोला, जि. गडचिरोली) आणि अखिला संकेर पुडो ऊर्फ आरती (३४, रा. मरकेगाव, जि. गडचिरोली) या दोघींचा समावेश आहे. या दोघींनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.
मंजुबाई २००५ तर आरती २०१० मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाली होती. राज्य सरकारने त्या दोघींवर प्रत्येकी ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. पोलिस महानिरीक्षक नागपूर संदीप पाटील यांच्यासह अन्य अधिकारी आणि कमांडंट ११३ बटालियन सीआरपीएफ यांच्या मार्गदर्शनानुसार आत्मसमर्पण पार पडले. या अगोदर गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. त्याच्या दुस-याच दिवशी दोन जहाल महिला नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.