नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, मला २ जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे. आत्मसमर्पण करण्यासाठी २ जून रोजी दुपारी ३ वाजता घरातून बाहेर पडेल, असेही केजरीवाल म्हणाले.
तुरुंगात असताना मला जनतेची काळजी वाटते. कारागृहातूनही दिल्लीचे काम सुरूच राहणार असून, दिल्लीचे काम थांबू देणार नाही, अशी ग्वाही केजरीवाल यांनी दिल्लीकरांना दिली. यासोबतच आपल्या आई -वडिलांची तब्येत ठीक नाही, यामुळे केजरीवाल यांनी आपल्या पालकांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही जनतेला केले.
यावेळी केजरीवाल म्हणाले की, तुरुंगात असताना मला इन्सुलिन न दिल्याने माझ्या किडनी आणि यकृतावर परिणाम झाला. यासोबतच तुरुंगात ५० दिवसांतच माझे वजन ७४ किलोवरून ६४ किलो झाले असून, डॉक्टरांनी याला मोठ्या आजाराचे लक्षण असल्याचे सांगितले आहे. माझ्यावर तुरुंगात असताना अनेक प्रकारचे अत्याचार झाले असून या वेळी मी किती काळ तुरुंगात राहीन हे मला माहीत नाही, पण माझे मनोबल उंचावले आहे, असेही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी म्हटले.