22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeलातूर३५ कृषि सेवा केंद्रांच्या तपासणीत आढळल्या त्रूटी  

३५ कृषि सेवा केंद्रांच्या तपासणीत आढळल्या त्रूटी  

लातूर : प्रतिनिधी
सध्या चालू खरीप हंगामात शेतक-यांना मुळ किंमतीत खत, बी-बियाणे, किटक नाशके मिळावेत म्हणून कृषि विभागाच्या ११ भरारी पथकांच्याकडून जिल्हयातील कृषि सेवा केंद्राची तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत ३५ कृषि सेवा केंद्रांवर त्रूटी असल्याचे समोर आले आहे. या संदर्भाने सुनावनीही पार पडली. या सुनावणीसाठी बोलावले असतानाही ३ कृषि दुकानदार गैर हजर राहिले. त्यामुळे या दुकानदारांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खरीप हंगामात बोगस बियाणे, खतांची विक्री होवू नये, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहून काम करावे. यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या सुचनेनुसार कृषि विभागाने ११ भरारी पथके तयार केली होती. या पथकांच्या माध्यमातून जिल्हयातील १ हजार ६५८ खतांची, १ हजार ८३६ बियाणांची, तर १ हजार १६३ किटक नाशक दुकानांची तपासणी करण्यात येत आहे.  जून-जुलै या महिण्यात कृषि दुकानांची सदर पथकांच्या निरीक्षकांकडून तपासणी करण्यात आली असता ३५ कृषि दुकानात परवाने दर्शनी भागात लावलेले दिसून आले नाहीत. साठा रजिस्टर अपूर्ण असणे, भाव फलक लावला नाही, बिलबूक अपूर्ण असणे, बियाणांचे स्त्रोत उपलब्ध नसने, अशा त्रूटी आढळून आल्या. त्रूटी असणा-या कृषि दुकानदारांना नोटीस पाठवून सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते.
या सुनावनीस ३५ पैकी ३२ कृषि दुकानदार सुनावनीसाठी उपस्थित राहिले. या सुनावनीत त्रूटीच्या संदर्भाने खुलासे सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. खुलासे समाधानकारक नसल्यास सदर कृषि दुकानदारांच्यावर बियाणे अधिनियम १९६६, किटकनाशके अधिनियम १९६८, खते नियंत्रण आदेश १९८५ च्या कायद्यानुसार कारवाई होणार आहे.   या सुनावणी प्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी मिलींद बिडबाग,  जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संतोष लाळगे, निरीक्षक कुठवाडे, राऊत, केदसे, भोसले आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR